Union Health Ministry on Junk Food: भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय समोसे, जिलेबी आणि लाडू यांसारख्या अन्न उत्पादनांवर हानिकारक असल्याचा इशारा देणारे लेबल लावणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता हा दावा खोटा असल्याचे समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या अन्न उत्पादनांवर कोणतेही चेतावणी लेबल लावले जाणार नसल्याचे म्हटलं आहे. समोसे, जिलेबी आणि लाडू यांसारख्या अन्नपदार्थांवर हानिकारक असल्याचा इशारा देणारे लेबल लावण्याचे कोणतेही निर्देश दिले नसल्याचे भारतीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
जिलेबीचा गोडवा आणि समोशाच्या तिखटपणासोबतच, आरोग्यविषयक इशारा देण्यात येणार असल्याची चर्चा देशभरात सुरु आहे. सिगारेट, तंबाखूसारखे समोसा आणि जिलेबीवर ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाणार असल्याचे समोर आलं होतं. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि युवकांमध्ये आवश्यकतेपेक्षा वाढणारे वजन यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जंक फूडवर इशारा देणारी सूचना लावण्याची तयारी केली होती. त्यानंतर आता केंद्राने समोसे, जिलेबी किंवा लाडू यांसारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थासाठी कोणतेही इशारा देणारे लेबल लावणार नसल्याचे म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले की, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना लेबल लावण्याचा कोणताही निर्णय नाही. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वतंत्रपणे कामाच्या ठिकाणी निरोगी गोष्टींच्या निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी सल्ला देणारा एक ऑईल बोर्ड जारी केला होता. लॉबी, कॅन्टीन, कॅफेटेरिया, बैठक कक्ष इत्यादी ठिकाणी असे बोर्ड लावण्याचा सल्ला देण्यात आला. जेणेकरून विविध अन्नपदार्थांमधील लपलेले फॅट आणि साखरेच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण होईल, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी म्हटलं.
दरम्यान, भारतात लठ्ठपणाचा आजार वेगाने पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, २०५० पर्यंत ४४.९ कोटी भारतीय लठ्ठ असतील. त्यानंतर, भारत या बाबतीत फक्त अमेरिकेच्या मागे असेल. सध्या, शहरी भागातील प्रत्येक पाचवा प्रौढ व्यक्ती लठ्ठपणाशी झुंजत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि कमी शारीरिक हालचालींमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असून हे आकडे चिंताजनक आहेत. आरोग्य मंत्रालयाचे हे पाऊल खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न आहे. हे बोर्ड फक्त इशारे देणार नाहीत तर लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल विचार करण्याची संधी देखील देतील.