Cryptocurrency News: क्रिप्टोकरेंसीवर भारतात पूर्णपणे बंदी येणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 21:23 IST2021-11-23T21:23:03+5:302021-11-23T21:23:37+5:30
समितीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही क्रिप्टोकरेंसीच्या मुद्द्यावर विविध मंत्रालयाच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे.

Cryptocurrency News: क्रिप्टोकरेंसीवर भारतात पूर्णपणे बंदी येणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
नवी दिल्ली – केंद्र सरकार क्रिप्टोकरेंसीवर विधेयक आगामी संसदीय अधिवेशनात सादर करणार आहे. या विधेयकाचं नाव द क्रिप्टोकरेंसी एँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करेंसी बिल २०२१ असं आहे. या विधेयकातंर्गत देशात सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरेंसीवर बंदी लावण्याची योजना आहे. जर हे विधेयक संसदेत पारित झालं तर बिटकॉईन आणि क्रिप्टोकरेंसीसारख्या बाजारात गुंतवणूक करणाऱ्या अनेकांसमोर मोठं संकट उभं राहू शकतं.
परंतु त्याचसोबत काही अपवाद वगळता याला परवानगी द्यावी अशीही मागणी जोर धरु लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, द क्रिप्टोकरेंसी एँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करेंसी विधेयक २०२१ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे मान्यताप्राप्त डिजिटल करेंसीच्या क्रिएशनसाठी एक फ्रेमवर्क बनवण्याची मागणी आहे. अलीकडेच भाजपाचे नेते जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीने क्रिप्टो फायनान्स आणि त्याच्या गुण-दोषांवर चर्चा केली. त्या चर्चेत क्रिप्टो एक्सचेंज प्रतिनिधी, ब्लॉक चेन आणि क्रिप्टो कौन्सिल, व्यापारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. अनेक सदस्य क्रिप्टो करेंसींवर पूर्णपणे बंदी लावण्याऐवजी बाजारात याबाबत नियम आणण्याच्या बाजूने आहेत. समितीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही क्रिप्टोकरेंसीच्या मुद्द्यावर विविध मंत्रालयाच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे.
केवळ २ तासांत १००० रूपयांचे झाले ६० लाख
सध्या क्रिप्टोकरन्सीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकांना जबरदस्त रिटर्न्स देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि लाखो पट परताना दिला आहे. सोमवारी एका नव्या क्रिप्टोकरन्सीनं मोठ्या प्रमाणात रिटर्न दिले. क्रिप्टोकरन्सीचं नाव Shih Tzu आहे. या क्रिप्टोकरन्सीचं नाव एका डॉग ब्रीडवरून ठेवण्यात आलं आहे. सोमवारी या करन्सीनं अवघ्या दोन तासांमध्ये कमाल केली. या क्रिप्टोकरन्सीमध्ये तब्बल 6 लाख टक्क्यांची वाढ झाली. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कॉईनमार्केटकॅपच्या डेटानुसार 2 तासांतच Shih Tzu मध्ये 6 लाख टक्क्यांची वाढ झाली. डिजिटल टोकन अवघ्या काही वेळात 0.000000009105 डॉलर्सवरून 0.00005477 डॉलर्सवर पोहोचली. यामध्ये ज्यानं १ हजार रूपयांची गुंतवणूक केली त्यांचे केवळ २ तासांमध्ये तब्बल ६० लाख रूपये झाले. एक्सचेंजमध्ये या डिजिटल टोकनचं व्हॉल्यूम ६५ टक्क्यांपर्यंत वाढलं.