नवी दिल्ली : केंद्र सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा मोठा निर्णय घेतला असून सेवा 33 वर्षे किंवा वयाची 60 वर्षे पूर्ण झालेली असल्यास 1 एप्रिल 2020 पासून सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडणार आहे. याबाबतचे मॅसेज, स्क्रीनशॉट सोशल मिडीयातून पसरत आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DoPT) ने कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्तीचा प्रस्ताव मंजूर केला असल्याचा उल्लेख या मॅसेजमध्ये होता. यामध्ये असे म्हटले होते की, एखाद्या कर्मचाऱ्याची 33 वर्षे नोकरी किंवा वयाची 60 वर्षे यापैकी जे आधी पूर्ण होईल त्याला 1 एप्रिल 2020 पासून सक्तीने निवृत्ती घ्यावी लागेल. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मिडीयावर याबाबतची अफवा पसरविली जात असून असा कोणताही प्रस्ताव मंजूर केलेला नसल्याचे केंद्र सरकाच्या सुत्रांनी मंगळवारी सांगितले. या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच अशा प्रकारचा कोणताही प्रस्तावही विचारात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.