'The government is the biggest debtor!' | 'सरकारच आहे सर्वांत मोठे थकबाकीदार!'

'सरकारच आहे सर्वांत मोठे थकबाकीदार!'

नवी दिल्ली : भारतात सरकारच सर्वांत मोठा थकबाकीदार असून, सरकारने वेळेवर बिले चुकती करणे सुरू केल्यास देशांतर्गत अर्थव्यवस्थेला भेडसावत असलेल्या अर्ध्याअधिक समस्या सुटतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ बाजारतज्ज्ञ रामदेव अग्रवाल यांनी केले.
सरकारने केवळ ३० दिवसांची बिले ३० दिवसांत देणे सुरू केले तरी एकतृतीयांश समस्या सुटतील, असेही अग्रवाल यांनी सांगितले. ‘हीरो माइंटमाइन शिखर परिषद २०१९’मध्ये ते बोलत होते.
‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे सहसंस्थापक असलेले रामदेव अग्रवाल या परिषदेत म्हणाले, देशाच्या धोरणकर्त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी भारताचे स्वत:चे वृद्धी प्रतिमान (ग्रोथ मॉडेल) विकसित करावे. चीनच्या वृद्धी प्रतिमानाबाबत बोलणे आता थांबवायला हवे. धोरण निर्धारण पातळीवरील गृहीतकांपेक्षा अर्थव्यवस्थेचे वास्तव खूपच भिन्न आहे.
अग्रवाल यांनी सांगितले की, भारतात ‘अतिथी देवो भव’ची परंपरा आहे. तथापि, विदेशी गुंतवणूकदारांचा जेव्हा विषय येतो, तेव्हा हे तत्त्व पाळले जात नाही. ‘एफपीआय’साठी (विदेशी गुंतवणूक संस्था) योग्य गुंतवणूक वातावरण तयार करायला हवे, अशी विनंती मी सरकारला करतो.
विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा आकर्षक बाजार आहे. ते नक्कीच येतील, यात संशय नाही. फक्त त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.

Web Title: 'The government is the biggest debtor!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.