उत्तम रस्ते, जल वाहतुकीला प्राधान्य देणार
By Admin | Updated: May 30, 2014 03:15 IST2014-05-30T03:15:56+5:302014-05-30T03:15:56+5:30
उत्तम रस्ते व जल वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते व जलवाहतूक, जहाज आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे

उत्तम रस्ते, जल वाहतुकीला प्राधान्य देणार
नवी दिल्ली : उद्योग आणि शेती हा देशाचा प्राण असून या क्षेत्रांच्या विकासासाठी उत्तम रस्ते व जल वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते व जलवाहतूक, जहाज आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. संसद भवनासमोरील परिवहन भवनाच्या इमारतीत असणार्या या रस्ते व जलवाहतूक, जहाज आणि महामार्ग मंत्रालयात गुरुवारी सकाळी ८ वाजता नितीन गडकरी आणि या विभागाचे राज्यमंत्री क्रि शन पाल यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी गडकरी यांच्या पत्नी कांचन, मुलगी केतकी यांच्यासह महामार्ग मंत्रालयाचे सचिव व अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले उद्योग आणि शेतीवर देशाचा विकास अवलंबून असून यासाठी पाणी, ऊर्जा, उत्तम संवाद व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. याआधी महाराष्ट्रात मंत्रिपदी असताना राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, उड्डाण पूल, वरळी-बांद्रा समुद्री पूल (सी लिंक), पंतप्रधान ग्राम सडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आपल्याला अनुभव असून आता देशातील रस्ते, नद्या व समुद्रातील जलवाहतूक व्यवस्था प्रशस्त करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. आपल्या मंत्रालयात पारदर्शी, ई-गव्हर्नन्स आणि पक्षपातविरहित कारभार ठेवत आपण या पदाला साजेशी कामगिरी करणार असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)