Good News यंदा नाही पडणार दुष्काळ
By Admin | Updated: March 27, 2017 13:54 IST2017-03-27T13:39:41+5:302017-03-27T13:54:58+5:30
पावसाळयाच्या एक दोन महिने आधी जाहीर होणा-या पावसाच्या अंदाजावर सर्वसामान्यांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष असते.

Good News यंदा नाही पडणार दुष्काळ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेती पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळयाच्या एक दोन महिने आधी जाहीर होणा-या पावसाच्या अंदाजावर सर्वसामान्यांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. पावसावर पीकपाणी अवलंबून असल्याने चांगला पाऊस व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.
'स्कायमेट' या हवामानविषयक संस्थेने यंदाच्या पावसाचे अंदाज जाहीर केले आहेत. स्कायमेटने वर्तवलेला अंदाज शेतकरी आणि राज्यकर्त्यांना दिलासा देणारा आहे. यंदा सामान्यपेक्षा मान्सूनचे प्रमाण कमी राहणार असले तरी, 95 टक्क्यांपर्यंत मान्सूनचा पाऊस होईल असा स्कायमेटचा अंदाज आहे.
मागच्यावर्षी पेक्षा पावसाचे हे प्रमाण कमी आहे. पण त्यामुळे दुष्काळ पडण्याचा धोका नाही. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात संपूर्ण देशात 887 मिमी पाऊस कोसळेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. 2014 मध्ये केंद्रात सत्तांतर झाले तेव्हापासून नेहमीच पावसाने नरेंद्र मोदी सरकारची चिंता वाढवली आहे.
पंतप्रधान म्हणून काम करताना नरेंद्र मोदींना पहिल्यावर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागला होता. 2014 मध्ये पाचवर्षातील नीचांकी पावसाची नोंद झाली होती. 12 टक्के पावसाची तूट राहिली होती. त्यानंतर 2015 मध्ये पुन्हा मान्सूनच्या पावसाने दगा दिला.
अल निनोच्या घटकाच्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यावर्षी 86 टक्के पाऊस झाला.
मागच्यावर्षी 2016 मध्ये 97 टक्के समाधानकारक पाऊस झाला. कमी पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच बसत नाही तर, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही किंमत मोजावी लागते.