खुशखबर ! UPSC नापास उमेदवारांनाही नोकरी मिळणार, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 17:40 IST2019-02-10T17:39:15+5:302019-02-10T17:40:01+5:30
यूपीएससी बोर्डाने केंद्र सरकारकडे मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र नोकरी देण्याची शिफारस केली आहे

खुशखबर ! UPSC नापास उमेदवारांनाही नोकरी मिळणार, पण..
नवी दिल्ली - देशातील स्पर्धा परीक्षांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढीस लागली आहे. त्यामुळे अवघ्या एका गुणांमुळे विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळाल्याचं पाहायला मिळते. अगोदर पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत देऊन यूपीएससीमध्ये अनेकजण आपलं नशिब आजमावतात. मात्र, अनेकदा मुलाखतीत निवड न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागते. पण, आता मुलाखत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
यूपीएससी बोर्डाने केंद्र सरकारकडे मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र नोकरी देण्याची शिफारस केली आहे. ओडिशामध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या संमेलनात बोलताना युपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेना यांनी सांगितले. यूपीएससीने केंद्र सरकार आणि विविध मंत्रालयांना अशा विद्यार्थ्यांनी भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे, जे नागरी सेवा आणि इतर परीक्षांच्या मुलाखत फेरीमध्ये बाद होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ तरी त्यांना मिळेल, असे आयोगाला वाटते.
एका वर्षात जवळपास 11 लाख उमेदवार विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेला बसतात. मात्र, केवळ 600 ते 800 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या 11 लाख विद्यार्थ्यांपैकी कित्येकजण जोमाने तयारी करतात, पूर्व परीक्षा पास होतात, मुख्य परीक्षाही पास होतात. मात्र, मुलाखतीनंतर काही गुणांमुळे मेरीटमध्ये मागे पडतात. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरलं जातं. कारण, या उमेदवारांना पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागते, पुन्हा पूर्व परीक्षेपासून या स्पर्धेत उतरावे लागते. त्यामुळे मुलाखतीपर्यंत पोहोचणाऱ्या, मेरीटमध्ये काही गुणांनी आपली रँक हुकलेल्या या उमेदवारांना इतरत्र सरकारी खात्यात नोकरी देण्यात यावी, अशी शिफारस आयोगाने केंद्राकडे केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा तणाव कमी होऊन, नोकरीच्या आशा अधिक जिवंत होतील, असेही सक्सेना यांनी म्हटले.
दरम्यान, यूपीएससी परीक्षा सहज आणि सोपी करण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच, एक भाग म्हणून यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात येणार आहे. तर, परीक्षा ऑनलाईन करण्याबाबतही आयोगाचा विचार सुरू आहे.