कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO) च्या ७ कोटी सदस्यांसाठी खूशखबर आहे. केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठीच्या पीएफच्या व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. जवळपास सर्व ईपीएफ खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाकडून व्याजदराची घोषणा करण्यात आल्यानंतर जवळपास दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षी ३३.५६ कोटी सदस्यांची खाती असलेल्या १३.८८ लाख संस्थांसाठी वार्षिक खाती अपडेट करण्यात येणार होती. ८ जुलैपर्यंत १३.८६ लाख संस्थांच्या ३२.३९ कोटी सदस्यांच्या खात्यामध्ये व्याज जमा करण्यात आलं आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९९.९ टक्के संस्था किंवा कंपन्या आणि ९६.५१ टक्के खात्यांसाठी वार्षिक अकाऊंड अपडेट पूर्ण झालं आहे. तर उर्वरित खात्यांमध्ये व्याज या आठवड्यामध्ये पाठवलं जाईल.
तुमच्या खात्यात पीएफची रक्कम जमा झाली आहे की, नाही याची माहिती तुम्ही मिसकॉलच्या माध्यमातून शिल्लक तपासून घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या आपल्या मोबाईलवरून तुम्ही ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर फोन करून तुम्ही शिल्लक तपासू शकता. तसेच EPFOHO UAN ENG हा मेसेज 7738299899 या मोबाईल क्रमांकावर पाठवून तुम्ही पीएफ बॅलन्स तपासू शकता.