सर्वांना वीज देणारी 'सौभाग्य' योजना 25 सप्टेंबरला होणार सुरू; ऊर्जामंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 22:11 IST2017-09-23T22:07:22+5:302017-09-23T22:11:24+5:30
देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत.

सर्वांना वीज देणारी 'सौभाग्य' योजना 25 सप्टेंबरला होणार सुरू; ऊर्जामंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली, दि. 23- देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के, सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. २५ सप्टेंबरला आरएसएसचे ज्येष्ठ नेते आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. याच दिवशी मोदींकडून 'सौभाग्य' योजना सुरू केली जाणार आहे. ही योजना नेमकी कशी असेल? याबद्दल आ.के सिंह यांनी सविस्तर सांगण्यास नकार दिला. पण या योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला जाईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
प्रत्येक गावात वीज पोहोचावी यासाठी राज्य सरकारांनी आपल्या योजना तयार कराव्यात अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत, असंही आर. के. सिंह यांनी म्हटलं आहे. या योजनांसाठी केंद्राने सहमती दर्शवल्यानंतर निधीचा पुरवठाही केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत ट्रान्स्फॉर्मर, मीटर आणि तारांसाठी सवलतही देण्यात येणार आहे. या योजनेचं नाव 'सौभाग्य' असं असणार आहे. या आठवड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यात या योजनेचाही समावेश होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
गावागावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी सरकार जलद गतीने काम करत आहे. तसंच सर्वांना २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी सरकारने २०१९चं लक्ष्य निश्चित केलं आहे. वीज खरेदी करण्याशी संबंधीत कायदा अधिक कडक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही ऊर्जामंत्री आर.के सिंह यांनी म्हंटलं आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत २० हजार मेगावॉट वीज वायू ऊर्जेपासून, तर २० हजार मेगावॉट वीज सौर ऊर्जेपासून तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.
देशातील जास्त वीज ग्राहकांचा कल प्रीपेड वीज जोडणी घेण्याकडे जाईल, असंही आर.के सिंह यांनी म्हंटलं आहे. यामुळे वीज कंपन्याचं नुकसान भरून निघायला मदत होईल, असं ते पुढे म्हणाले. वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार एनटीपीसीची क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. राज्य सरकारांची वीजेची मागणी पूर्ण करता यावी, म्हणून केंद्र सरकार वीज खरेदी कराराला चालना देण्याचा विचार करत आहे. भारत विकासाच्या मार्गावर असून भविष्यात वीजेची मागणी वाढणार असल्याचेही ऊर्जामंत्री आर. के सिंह यांनी म्हंटलं आहे.