डिझेल वाहनधारकांसाठी 'अच्छे दिन', ७ वर्षांनी डिझेल स्वस्त होणार ?

By Admin | Updated: September 9, 2014 15:47 IST2014-09-09T15:42:18+5:302014-09-09T15:47:36+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये लक्षणीय घट झाल्याने भारतातही तब्बल सात वर्षांनी डिझेलच्या दरांमध्ये कपात केली जाण्याची चिन्हे आहेत.

'Good day' for diesel vehicle owners, diesel will be cheaper after 7 years? | डिझेल वाहनधारकांसाठी 'अच्छे दिन', ७ वर्षांनी डिझेल स्वस्त होणार ?

डिझेल वाहनधारकांसाठी 'अच्छे दिन', ७ वर्षांनी डिझेल स्वस्त होणार ?

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ९ - महागाईचे चटके सोसणा-या सर्वसामान्यांसाठी आता 'अच्छे दिन' येण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये लक्षणीय घट झाल्याने भारतातही तब्बल सात वर्षांनी डिझेलच्या दरांमध्ये कपात केली जाण्याची चिन्हे आहेत. डिझेलच्या दरात कपात झाल्यास महागाईचे प्रमाणही घटेल तसेच रिझर्व बँकेकडून येत्या काही दिवसांमध्ये जाहीर केल्या जाणा-या पतधोरणात व्याजदरही कमी होईल असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.  
सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ९९ डॉलर्सपर्यंत घसरली होती. चीन आणि अन्य काही देशांमधील मागणी घटल्याने दर खाली आल्याचे सांगितले जाते. तब्बल १४ महिन्यांनी कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर्सपेक्षा कमी झाली आहे. यामुळे भारतातील डिझेलच्या दरामध्ये कपात केली जाऊ शकते अशी माहिती पेट्रोलियम खात्यातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. १५ सप्टेंबररोजी भारतातील पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आढावा घेतला जाणार असून यानंतर डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. 
सध्या दर १५ दिवसांनी पेट्रोलच्या दरांचा आढावा घेतला जातो. तर गेल्या वर्षी जानेवारीपासून डिझेलचे दरामध्ये दर महिन्याला ५० पैशांनी वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर आणि पंपांवरील डिझेलचे दर हे समान होईपर्यंत ही दरवाढ केली जाणार होती व त्यानंतर डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले जाणार होते. आता डिझेलच्या दरात कपात झाल्यास डिझेल वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल. 
 
 

Web Title: 'Good day' for diesel vehicle owners, diesel will be cheaper after 7 years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.