Ranya Rao Gold Smuggling Case: कन्नड अभिनेत्री रान्या राव सोन तस्करीच्या प्रकरणात चांगलीच अडकली आहे. साडे चौदा किलो सोन्यासह राण्याला बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अशातच भाजपच्या नेत्याने रान्या रावच्या सोने तस्करी प्रकरणाबाबत धक्कादायक आणि अश्लील असं वक्तव्य केलं आहे. तसेच या प्रकरणात कर्नाटकातील मंत्र्यांचाही समावेश असल्याचा दावा भाजप नेत्याने केला.
रान्या रावला ३ मार्च रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून बंगळुरूला येत असताना १२.५६ कोटी रुपयांच्या १४ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. त्यानंतर रान्या राव अनेकवेळा दुबईला गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. अशातच कर्नाटकातील भाजप आमदार बसनगौडा पाटील यतनाल यांनी हाय-प्रोफाइल सोन्याच्या तस्करी प्रकरणाबाबत धक्कादायक वक्तव्य केलं. या तस्करी प्रकरणात कर्नाटक सरकारच्या अनेक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, त्यांनी नावे विधानसभेत जाहीर करणार असल्याचे सांगितले.
"तिच्या अंगभर सोने गुंडाळले होते. तिच्याकडे जिथे छिद्र होते, तिथे तिने सोने लपवून त्याची तस्करी केली. या तस्करीच्या याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी," असं बसनगौडा पाटील यतनाल यांनी म्हटलं. "या प्रकरणाशी संबंधित सर्व मंत्र्यांची नावे मी विधानसभेच्या अधिवेशनात जाहीर करेन. तिचे (रान्याचे) कनेक्शन, सुरक्षा मिळवण्यात तिला कोणी मदत केली आणि तिने सोने कसे आणले, अशी सर्व माहिती मी गोळा केली आहे. मी अधिवेशनात सर्वकाही उघड करणार आहे. तिने सोने कोठे लपवले होते आणि कशी तस्करी केली, हेही मी सांगेन," असंही बसनगौडा पाटील यतनाल म्हणाले.
दरम्यान, रान्या रावने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. मला १०-१५ वेळा कानाखाली मारल्या आणि काही कोऱ्या आणि आधीच लिहिलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, असं रान्या रावने म्हटलं.