GoAir च्या पायलटची एवढी खतरनाक धमकी की प्रवाशांनी विमानातून काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 20:23 IST2018-02-19T19:55:54+5:302018-02-19T20:23:42+5:30
वैमानिकाच्या खतरनाक धमकीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी वैमानिकासह सर्व कर्मचारी बदलण्याची मागणी केली, पण त्यांची मागणी मान्य न करता वैमानिक बदलला जाणार नाही असं गो-एअरने स्पष्ट केलं. अखेरीस...

GoAir च्या पायलटची एवढी खतरनाक धमकी की प्रवाशांनी विमानातून काढला पळ
नवी दिल्ली : विमानसेवा देणारी कंपनी गो-एअरच्या वैमानिकाने दिलेल्या एका खतरनाक धमकीमुळे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. संबंधित वैमानिकाने दिल्ली-बंगळुरू विमान क्रॅश करण्याची धमकी दिली होती, टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. मात्र, ही घटना केव्हाची आहे याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे गो-एअर प्रशासनाने या वृत्ताचं खंडन केलं आहे.
नेमकं काय झालं -
नवी दिल्लीहून बंगळुरूला जाणा-या गो-एअरच्या G8113 विमानात हा प्रकार घडला. सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी या विमानाने उड्डाण घेणं अपेक्षित होते. 5 वाजून 10 मिनिटांनी विमानाचं बोर्डिंग सुरू झालं. सर्व प्रवासी येऊन विमानात बसले, पण दोन तास होऊन गेले म्हणजे सकाळचे 7 वाजले तरी वैमानिकाचा पत्ता नव्हता. त्यामुळे विमानात बसलेले प्रवासी वैतागले आणि विमानाच्या बाहेर 'एअर ब्रिज'वर येऊन ते वैमानिकाची वाट पाहात थांबले. कोणतीही घोषणा होत नव्हती त्यामुळे चिडलेल्या काही प्रवाशांनी गोंधळ घालत आरडाओरडा करायला सुरूवात केली. थोड्यावेळाने वैमानिक विमानाच्या दिशेने येताना दिसला. वैमानिकाला पाहून काही प्रवाशांनी मोबाइल काढला आणि त्याची शूटिंग करण्यास सुरूवात केली. प्रवासी शूटिंग करत असल्यामुळे वैमानिक चिडला आणि त्याने शूटिंग करण्यास मनाई केली. पण आम्ही शूटिंग करणारच आणि हे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू असं प्रवासी म्हणाले. त्यावर वैमानिकाने धमकी दिली. जर सोशल मीडियात फोटो शेअर केले तर विमान क्रॅश करेल अशी धमकी वैमानिकाने दिली असा दावा प्रवाशाने केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
वैमानिकाने दिलेल्या धमकीबाबत त्या प्रवाशांनी विमानातील इतर प्रवाशांना सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी विमानातील वैमानिकासह सर्व कर्मचारी बदलण्याची मागणी केली, पण त्यांची मागणी मान्य न करता वैमानिक बदलला जाणार नाही असं गो-एअरने स्पष्ट केलं. अखेरीस 185 प्रवासी असलेल्या या विमानातील तीन प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत या वैमानिकासह प्रवास करणार नाही असं म्हणत विमानातून काढता पाय घेतला. त्यामुळे शेवटी 182 प्रवाशांना घेऊन या विमानाने सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण घेतलं आणि 11 वाजून 20 मिनिटांनी हे विमान बंगळुरूत दाखल झालं.
पण, दुसरीकडे गो-एअरकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. वैमानिकाला उशीर होण्यामागे प्रशासकीय कारण असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.