"...तर सुशांतसिंह राजपूतसारखी वेळ येईल"; मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगताना CM प्रमोद सावंतांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:16 IST2025-01-14T12:27:53+5:302025-01-14T13:16:56+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच उदाहरण दिलं.

"...तर सुशांतसिंह राजपूतसारखी वेळ येईल"; मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगताना CM प्रमोद सावंतांचे विधान
Goa CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा हवाला देऊन तरुणांना आरोग्याचे महत्त्व समजावले आहे. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मानसिक आरोग्य आणि आत्महत्येचा संबंध जोडणारे विधान करून वादात सापडले आहे. उत्तर गोव्यातील दोनापावला येथे युवा परिषदेत बोलताना भाजप नेते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या महत्त्वावर भर दिला.
राजभवन येथील दरबार हॉल येथे युवा नेता परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत युवा प्रतिनिधींना संबोधित करत होते. शरीरासोबत मनाचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. मानसिक आरोग्य उत्तम नसल्यास काही जणांवर सुशांतसिंह राजपूतसारखी वेळ येऊ शकते. त्यामुळे शारीरिक व मानसिक सदृढतेसाठी रोज अर्धा तास वेळ काढा, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मात्र आता प्रमोद सावंत यांनी सुशांतसिंह राजपूत याचा उल्लेख करून मानसिक आरोग्याला आत्महत्येशी जोडणारे विधान केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
"शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवसातून किमान पाचतरी सूर्यनमस्कार घालावे. आपले आरोग्य सर्वात महत्वाचे आहे, पण याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि कपडे व वस्तूंवर खर्च करतो, पण काय खातो आणि आरोग्याची काळजी कशी घेतो हे महत्वाचे आहे. लीडर होण्यासाठी फीट होणे देखील तितकेच महत्वाचे आहे. दिवसातून किमान अर्धा तास तरी स्वत:च्या आरोग्यासाठी द्या. तन आणि मन दोघांची काळजी घ्या. शरिराबरोबर मन देखील तितकेच फिट ठेवणे महत्वाचे आहे," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
"मनाने भक्कम नसल्यास बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने जशी आत्महत्या करण्याची वेळ अनेकांवर येते. त्यामुळे मनाचा व्यायमही महत्वाचा आहे. शारीरिक व मानसिक सदृढतेसाठी रोज अर्धा तास वेळ काढ," असं आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
दरम्यान, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी मृत्यूचा तपास सुरू केला, जो नंतर विविध अफवांचा विषय बनला. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते की, सुशांतसिंह राजपूतने नैराश्येने आत्महत्या केली होती. त्याचा मृत्यू आत्महत्या असल्याचे घोषित करून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र यानंतर बॉलिवुडमध्ये अनेक घडामोडी देखील घडल्या होत्या.