नरेंद्र मोदींच्या भाषणात दिसली आगामी बजेटची झलक
By Admin | Updated: August 15, 2014 09:12 IST2014-08-15T09:12:03+5:302014-08-15T09:12:03+5:30
पहिलं बजेट युपीएच्या पावलावर पाऊल टाकणारं असलं तरी पुढील वर्षाचं भारताचं बजेट कसं असेल याची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दाखवली.

नरेंद्र मोदींच्या भाषणात दिसली आगामी बजेटची झलक
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १५ - पहिलं बजेट युपीएच्या पावलावर पाऊल टाकणारं असलं तरी पुढील वर्षाचं भारताचं बजेट कसं असेल याची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दाखवली. कुठल्याही नेत्याच्या नावे योजना लागू न करता संसदेच्या नावानं आदर्श ग्राम योजना मोदींनी जाहीर केली असून प्रत्येक खासदारानं सुरुवातीला एका गावात व २०१९ पर्यंत पाच गावांमध्ये आदर्श ग्राम योजना राबवावी असे सांगितले. हे गाव कसं असेल याची ब्ल्यू प्रिंट ११ ऑक्टोबर या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मतिथीच्या दिवशी सगळ्या खासदारांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. सगळ्या राज्यांनी आमदारांच्या सहाय्यानं अशाच प्रकारचा उपक्रम हाती घ्यावा असेही त्यांनी सुचवले. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये हजारो गावांना आदर्श ग्राम करण्याची योजना मोदींच्या डोक्यात असून बजेटमध्ये त्याचे प्रतिबिंब पडेल अशी अपेक्षा आहे.
याखेरीज डिजिटल इंडियाचं स्वप्न दाखवताना मोदींनी जगभरातल्या उद्योगांनी उत्पादनासाठी भारतात यावं असं आवाहन केलं. मेक इन इंडिया असे आवाहन करत माल जगभरात कुठेही विका, परंतु बनवा भारतात असे सांगत पुढील बजेटमध्ये एफडीआय व उद्योगजगतासाठी मोठ्या प्रमाणावर संधी असतील असे दिसत आहे. प्लॅनिंग कमिशननं आपलं काम चांगलं केलं असलं तरी आता त्याची गरज संपली असल्याचं स्पष्ट सांगत प्लॅनिंग कमिशन बरखास्त करत नवीन संस्था सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रत्येक गरीबाचं बँक खाते असेल असे सांगत त्याला एक लाख रुपयाचा विमा मिळेल ही योजनाही मोदींनी जाहीर केली. त्यामुळे पुढचं बजेट गरीबांच्यासाठी, बेरोजगारांसाठी आणि ग्रामीण भारतासाठी उत्साहवर्धक असेल अशी शक्यता आहे.