मृत्यूनंतर तरी सन्मान द्या, तमाशा बंद करून न्याय द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 05:51 IST2025-10-15T05:50:55+5:302025-10-15T05:51:18+5:30
आयपीएस अधिकारी आत्महत्येप्रकरणी राहुल गांधी यांची मागणी, दोषींना पकडण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

मृत्यूनंतर तरी सन्मान द्या, तमाशा बंद करून न्याय द्या!
चंडिगड : हरयाणातील आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांच्या आत्महत्येला जे दोषी असतील त्यांना त्वरित पकडावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. या प्रकरणात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे व दोषींना पकडून द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
मंगळवारी राहुल गांधी यांनी पुरन कुमार यांच्या पत्नी आयएएस अधिकारी अमनीत कुमार व त्यांच्या दोन मुलींची तासभर भेट घेतली. गेली अनेक वर्षे मागासवर्गीय अधिकाऱ्यांशी पद्धतशीर भेदभाव केला जातो. त्यांचा मानसिक छळ केला जातो. सार्वजनिकरीत्या त्यांना अपमानित केले जाते, त्यांच्यावर अत्याचार केला जातो असे पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले. पुरन कुमार यांच्यावर अद्याप अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. त्यांच्या कुटुंबावरचा दबाव आता बंद करा. कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करा, त्यांना मृत्यूनंतर तरी सन्मान द्या, हा तमाशा बंद करा, अशी मागणी केली आहे.
डीजीपी सक्तीच्या रजेवर
पुरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणावरून सोमवारी हरयाणा सरकारने पोलिस महासंचालक शत्रूजीत कपूर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. सरकारने याआधी रोहतकचे जिल्हा पोलिस प्रमुख नरेंद्र बिजारनिया यांचीही बदली केली होती. मात्र, त्यांची अन्य कुठे नियुक्ती केली नव्हती.
पुरन कुमारांवर आरोप, पोलिसाची आत्महत्या
पुरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत हरयाणा पोलिस दलातील संदीप कुमार या असिस्टंट सब-इन्स्पेक्टरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. तत्पूर्वी लिहिलेल्या व्हिडिओ व चिठ्ठीत त्यांनी आरोप केले.