‘तिवरे धरण दुर्घटनेतील वारसदारांना भरपाई द्या’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 23:33 IST2019-07-04T23:32:30+5:302019-07-04T23:33:45+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून बळी पडलेल्या २३ जणांच्या वारसदारांना भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात गुरुवारी केली.

‘तिवरे धरण दुर्घटनेतील वारसदारांना भरपाई द्या’
नवी दिल्ली : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून बळी पडलेल्या २३ जणांच्या वारसदारांना भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात गुरुवारी केली.
ते म्हणाले की, ही धरणफुटी या भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झाली असे सांगितले जात आहे. पण त्या गोष्टीत तथ्य नाही. तिवरे धरणाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे असे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी रोजी लेखी कळवूनही त्या दिशेने पावले उचलण्यात आली नाहीत. तब्बल १२ कोटी रुपये खर्चून २०१२ साली तिवरे धरण बांधण्यात आले होते. या प्रकल्पाचा मूळ खर्च २ कोटी रुपये होता पण कालांतराने त्यात खूप वाढ झाली. तिवरे धरण फुटल्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई देण्यात यावी, या दुर्घटनेत ज्यांची घरे वाहून गेली त्यांचे पुनर्वसन करावे अशा मागण्याही हुसेन दलवाई यांनी केल्या. ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी असेही दलवाई यांनी सांगितले.