Gujarat School Viral Video: जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताला हादरवून सोडलं होतं. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा जीव गेला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देखील दिलं. देशभरातून या कारवाईचे कौतुक देखील करण्यात आलं. अशातच गुजरातमधील एका शाळेत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सादर केलेल्या एका नाटकामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या नाटकात दशतवादी बनललेल्या विद्यार्थीनींना चक्क बुरखा घातल्याने वादाला तोंड फुटलं आहे.
गुजरातच्या भावनगर येथील शाळेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर एक नाटक सादर करण्यात आले. या व्हिडिओमध्ये काही मुलींनी नाटकात दहशतवाद्यांची भूमिका साकारली होती. यावेळी त्यांनी बुरखा घातला होता. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
हा व्हिडिओ १५ ऑगस्ट रोजी शाळेतील एका कार्यक्रमाचा आहे. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यीनींनी बुरखा घातल्याने वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर लोक याला 'इस्लामोफोबिक' आणि 'सांप्रदायिक सलोखा बिघडवणारा' म्हणत आहेत. शाळेने या प्रकरणाचे स्पष्टीकरण देत म्हटले आहे की विद्यार्थी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित एक नाटक करत होते. दहशतवादी बनणाऱ्या विद्यार्थ्यांना काळे कपडे घालण्यास सांगण्यात आले होते पण ते बुरखा घालून आले होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी जमिनीवर बसलेले आहेत. दरम्यान, बुरखा घातलेल्या काही विद्यार्थीनी बंदुका घेऊन येतात आणि गोळ्या झाडतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी याला जातीय सलोखा बिघडवण्याचे षडयत्रं म्हटलं आणि विद्यार्थ्यांना बुरखा घालून दहशतवादी का दाखवले गेले असा प्रश्न विचारला.
"शाळेतील मुलींनी हे नाटक सादर केले होते ज्याचा विषय पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर होता. यामध्ये काही मुली दहशतवादी होत्या, काही सैनिक होत्या आणि काही पीडित महिला होत्या. दहशतवादी मुलींची भूमिका करणाऱ्या मुलींना काळे कपडे घालण्यास सांगितले होते पण त्या बुरखा घालून आल्या होत्या. आमचा हेतू कोणत्याही समुदायाला किंवा वर्गाला दुखावण्याचा नव्हता," असं स्पष्टीकरण शाळेच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आलं आहे.
दरम्यान, भावनगर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासकीय अधिकारी मुंजल बलदानिया यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना समजल्याचे सांगितले. व्हिडिओची चौकशी केली जात आहे. चौकशीनंतर शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावली जाईल आणि उत्तर मागितले जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.