२० महिन्यांपासून जर्मनीत अडकली मुलगी; आईचे पंतप्रधान मोदींना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 07:59 IST2023-06-04T07:55:12+5:302023-06-04T07:59:03+5:30
काय आहे प्रकरण?

२० महिन्यांपासून जर्मनीत अडकली मुलगी; आईचे पंतप्रधान मोदींना साकडे
नवी दिल्ली: एका भारतीय जोडप्याची २७ महिन्यांची मुलगी मागील २० महिन्यांपासून जर्मनीच्या बाल देखभाल गृहात अडकून पडली असून आपली मुलगी आपल्याला परत मिळावी, यासाठी आईने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. भारत सरकारने याप्रकरणी जर्मन सरकारकडे नाराजीही व्यक्त केली आहे.
अरिहा शाह असे या मुलीचे नाव आहे. दाेन वर्षे पाच महिने वयाची ही मुलगी बर्लिन येथील बाल देखभाल गृहात आहे. तिचा ताबा मिळावा, यासाठी तिची आई धारा शाह सातत्याने प्रयत्न करीत आहे. तथापि, त्याला यश आले नाही. त्यामुळे धारा यांनी पंतप्रधान मोदी यांना मदतीची विनंती केली होती. धारा शाह यांनी सांगितले की, आम्हाला मुलीच्या डायपरवर रक्त आढळले होते. पहिल्यांदा आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो तेव्हा सर्व काही ठीक असल्याचे आम्हाला सांगण्यात आले.
दुसऱ्यांदा मात्र मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप लावून तिला बालगृहात पाठविण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, अरिहास भारतात आणण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न आम्ही करीत आहोत.
काय आहे प्रकरण?
२३ सप्टेंबर २०२१ रोजी जर्मन अधिकाऱ्यांनी सात महिन्यांच्या अरिहाला ताब्यात घेऊन फॉस्टर होममध्ये पाठवले होते. मुलीच्या माता-पित्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला होता. नंतर हा आरोप चुकीचा असल्याचे सिद्ध झाले तरी मुलगी जर्मन सरकारच्याच ताब्यात राहिली.