भाच्याला वाचवण्यासाठी तरुणी रेल्वे ट्रॅकवर झोपली; भाचा वाचला, पण तिच्या शरीराचे तुकडे झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 15:27 IST2021-12-11T15:24:41+5:302021-12-11T15:27:25+5:30
रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या चिमुकल्याला वाचवताना तरुणीचा मृत्यू; घटनेमुळे कुटुंबावर शोककळा

भाच्याला वाचवण्यासाठी तरुणी रेल्वे ट्रॅकवर झोपली; भाचा वाचला, पण तिच्या शरीराचे तुकडे झाले
मुरादाबाद: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये भाच्याला वाचवताना एका तरुणीनं स्वत:चा जीव दिला आहे. तीन वर्षांचा भाचा रेल्वे रुळांमध्ये अडकला होता. त्याची सुटका करण्याचा प्रयत्न तरुणीनं केला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. तितक्यात तरुणीला समोरून ट्रेन येताना दिसली. भाच्याचा जीव वाचवण्यासाठी तरुणी त्याच्या अंगावर झोपली. पुढच्या काही क्षणांत दोघांच्या अंगावरून ट्रेन गेली. तरुणीच्या प्रसंगावधानामुळे भाच्याचा जीव वाचला. मात्र मावशीचा जीव गेला. तिच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले.
भाचा आरवचा जीव वाचवणारी शशिबाला (२० वर्षे) कुंदरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हुसेनपूर गावची रहिवासी आहे. ८ डिसेंबरला शशिबालाच्या मावस बहिणीचा विवाह होता. बहिणीच्या पाठवणीनंतर शशिबाला कुटुंबातील महिलांसोबत मुरादाबाद-लखनऊ रेल्वे रुळांच्या पलीकडे असलेल्या तलावाजवळ गेली होती. तिथून परतत असताना तिच्या मावस भावाच्या चिमुरड्या मुलाचा पाय रेल्वे ट्रॅकमध्ये अडकला. तितक्यात शशिबालाला ट्रेन येताना दिसली. आरवचा जीव वाचवण्यासाठी शशिबाला क्षणाचाही विलंब न करता धावली.
शशिबालानं आरवची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला अपयश आलं. ट्रेन जवळ आली होती. ते पाहून शशिबाला आरववर झोपली. दोघांच्या अंगावरून ट्रेन गेली. शशिबालासोबत असलेल्या महिला ट्रॅककडे धावल्या. त्यांना आरव सुरक्षित अवस्थेत दिसला. मात्र शशिबालाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते.
घटनेची माहिती मिळताच लग्न घरावर शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शशिबालाच्या मृतदेहाचे तुकडे गोळा केले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले. शशिबाला तिच्या वडिलांचा एकमेव आधार होती. १२ वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला. शशिबालांचं संगोपन नीट व्हावं यासाठी तिच्या वडिलांनी दुसरं लग्नदेखील केलं नाही. शशिबालाच्या अकाली निधनानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.