VIDEO: कॅब चालकाच्या थोबाडीत मारल्या, फोन तोडला; भररस्त्यात पोलिसांसमोर तरुणीचा राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 16:27 IST2021-08-02T16:24:35+5:302021-08-02T16:27:44+5:30
तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; चालक गाडी अंगावर घालत असल्याचा आरोप करत मारहाण

VIDEO: कॅब चालकाच्या थोबाडीत मारल्या, फोन तोडला; भररस्त्यात पोलिसांसमोर तरुणीचा राडा
लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भररस्त्यात एका तरुणीनं कॅब चालकाला मारहाण केली आहे. वाहतूक पोलिसांसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तरुणी चालकाला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र पोलिसांसमोर हा संपूर्ण घडत असताना त्यांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. मारकुट्या तरुणीला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.
CCTV से ऐसा लग रहा है कि ये लड़की इस गरीब टैक्सी चालक को इतनी बुरी तरह से पीट रही है क्यूंकि उसने गाड़ी नहीं रोकी! ये बेहद शर्मनाक है. किसने अधिकार दिया इस लड़की को मारपीट करने का? इस मामले में @Uppolice जांच करे और कानून को हाथ में लेने के अपराध में महिला पर कड़ी कार्यवाही हो. pic.twitter.com/IrVUKkeINC
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) August 2, 2021
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरून गाड्या जात असताना रस्ता ओलांडत असल्याचं दिसत आहे. तरुणी एका कारसमोर येताच चालकानं कार थांबवली. मात्र तरुणीनं अपघात झाल्याचा आरोप करत उबर चालकाला जबर मारहाण केली. भररस्त्यात तरुणीनं चालकाच्या अनेकदा श्रीमुखात भडकावली. तिनं चालकाचा मोबाईल काढून घेतला आणि तो तोडला. यावेळी एक तरुण चालकाच्या मदतीला आला. तरुणीनं त्याच्याशीही हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वजीरगंजमध्ये वास्तव्यास असलेल्या इनायत अलींचा लहान भाऊ सहादत अली उबर कार चालवतो. सहादत शुक्रवारी रात्री सरोजनीनगर परिसरातून प्रवाशाला सोडून परतत होता. लाल सिग्नल असल्यानं तो कृष्णानगरच्या चौकात थांबला होता, असं इनायत यांनी सांगितलं. यावेळी एक तरुणी रस्ता ओलांडत होती. नीट गाडी चालव म्हणत ही तरुणी सहादतवर संतापली. तिनं कॉलर धरून सहादतला कारच्या बाहेर काढलं. चालक माझ्या अंगावर गाडी चढवत असल्याचं म्हणत तिनं आरडाओरडा केला. सहादतला तिनं अनेकदा थोबाडीत मारली आणि त्याचा फोनही तोडला.