"बाहेर या, मतदान करा"; सचिनकडून नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मतदानाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 03:34 PM2023-11-07T15:34:28+5:302023-11-07T15:36:21+5:30

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सचिन राजकीय मैदानात मतदारांसाठी बॅटींग करताना दिसतआहे. 

''Get Out, Vote''; Sachin Tendulkar appeals to people of Chhattisgarh and mizoram to vote | "बाहेर या, मतदान करा"; सचिनकडून नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मतदानाचं आवाहन

"बाहेर या, मतदान करा"; सचिनकडून नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मतदानाचं आवाहन

देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज छत्तीसगडमध्ये मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतरत्न सचिन तेंडुलकरने छत्तीसगडमधील नागरिकांना मतदानाचं आवाहन केलंय. हर एक Vote जरुरी होता है, असे म्हणत सचिनने मतदारानां मतदान करण्याचं आवाहन केलंय. निवडणूक आयोगाने मतदारांना आकर्षित आणि प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरची "राष्ट्रीय आयकॉन" म्हणून निवड केली आहे. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सचिन राजकीय मैदानात मतदारांसाठी बॅटींग करताना दिसतआहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ECI ने गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली होती. त्यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी कर्णधार एम.एस. धोनी, अभिनेता आमिर खान आणि बॉक्सर मेरी कोम सारख्या दिग्गजांना देखील ECI ने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवडले होते. यंदा निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची 'नॅशनल आयकॉन' म्हणून निवड केली आहे. त्यामुळे, सचिन तेंडुलकरचा फोटो वापरुन मतदान जनजागृती केली जात आहे. 


छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतू, हा भाग नक्षलग्रस्त असल्याने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान घेतले जाणार आहे. २० पैकी १० मतदारसंघांत ही वेळ आहे, असे असताना मतदारांना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांच्या छायेखाली मतदानाला यावे लागत आहे. आता, सचिन तेंडुलकरनेही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. सचिनने निवडणूक आयोगाचे ट्विट रिट्विट करत, आज मतदानाचा दिवस असल्याचं म्हटलं. प्रत्येक मत हे आपल्या भविष्याचा आवाज आहे. म्हणून, बाहेर पडा आणि मतदान करा. जबाबदार मतदार व्हा आणि मतदान करा. मिझोरम आणि छत्तीसगडमध्ये मतदान करा, असे आवाहन सचिनने केले आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत 22.18% मतदान झाले आहे. 

सचिन, ३ वर्षांसाठी नॅशनल आयकॉन

सचिन तेंडुलकर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती आणि शिक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित करणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या उपस्थितीत सचिनने 'नॅशनल आयकॉन' म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली. सचिनसोबत 3 वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. विशेषत: तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सचिनची या कामासाठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे निवडणूक आणि सामान्य जनता, विशेषतः तरुण आणि शहरी लोकांमधील दरी भरुन काढण्याचे काम केले जाईल. 

Web Title: ''Get Out, Vote''; Sachin Tendulkar appeals to people of Chhattisgarh and mizoram to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.