Jammu-Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान, जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून भीषण गोळीबार करण्यात आला होता. त्यात 'गौरी' नावाच्या गाईच्या पायाला गोळी लागल्यामुळे, तिचा पाय कापावा लागला होता. गोळी लागल्यामुळे गौरी जगणार नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, जगण्याची तीव्र इच्छा असलेली गौरी जगली आणि आता तिला नवीन पायदेखील मिळला आहे.
आजतकच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्या गौरीला भारतात तयार केलेला खास कृत्रिम पाय 'कृष्णा लिंब' लावला आहे. हा कृत्रिम पाय खासकरुन जनावरांसाठी तयार करण्यात आला असून, यामुळे गौरीला नवीन आयुष्य मिळाले आहे. या कृत्रिम पायामुळे गौरी पूर्वीप्रमाणे चालू शकते. अॅनिमल प्रोस्थेसिस क्षेत्रातील नावाजलेले डॉक्टर तपेश माथुर यांनी हा पाय तयार केला आहे. विशेष म्हणजे, माथुर यांनी आतापर्यंत 22 राज्यातील हजारो दिव्यांग जनावरांना नवीन आयुष्य दिले आहे.
महत्वाचे म्हणजे, गरिबांच्या जनावरांसाठी ते मोफत सेवा देतात. त्यांना या कामासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘गौरी’ला लावलेला कृत्रिम पाय फक्त तिला चालण्यात मदत करणार नाही, तर सीमावर्ती भागात जखमी झालेल्या इतर जनावरांसाठी आशेचा किरण घेऊन आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन परिसरात दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 26 नेक पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे कठोर कारवाई केली. यादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करुन अनेक हल्ले केले. मात्र, भारतीय संरक्षण दलांनी हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले.