कचरावेचकाने आयुष्यभराच्या कमाईतून उभारला स्वत:चाच पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 06:14 IST2020-09-21T06:13:51+5:302020-09-21T06:14:00+5:30
तामिळनाडूतील आगळी घटना; नाव कमाविण्याचे ध्येय पूर्ण केले

कचरावेचकाने आयुष्यभराच्या कमाईतून उभारला स्वत:चाच पुतळा
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेम : तामिळनाडूतील एका कचरावेचकाची लहानपणापासून नाव कमाविण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने एक आगळावेगळा मार्ग अवलंबला. आयुष्यभराच्या कमाईतून जमा झालेल्या १० लाख रुपयांतून त्याने जमीन विकत घेतली व तिथे आपला पाच फूट उंचीचा पुतळा उभारला.
या कचरावेचकाचे नाव नल्लातंबी (६०) असून तो सालेम जिल्ह्यातील अतनूरपट्टी या गावी राहतो. रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे भंगार वेचून व ते विकून त्याने आयुष्यभर आपला उदरनिर्वाह चालविला.
त्याने सांगितले की, नाव कमाविण्याची मला लहानपणापासून खूप इच्छा होती. ती आता विकत घेतलेल्या जमिनीत माझा पुतळा उभारून पूर्ण केली आहे. २० वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहामुळे नल्लातंबी हा आपल्या बायको व मुलांपासून वेगळा राहू लागला. तो पूर्वी कुटुंबासह अनाईमेदू या गावी राहत होता. तिथून नल्लातंबी अतनूरपट्टी या गावी स्थायिक झाला. तिथे आल्यानंतर त्याने प्रथम मोलमजुरी केली. त्यानंतर कचरावेचकाचे काम करू
लागला.
आता तो रोज या कामातून २५० ते ३०० रुपये कमावतो. आयुष्यभराच्या कमाईतून नल्लातंबी याने नझपाडी-बेलूर रस्त्यालगत १२०० चौ. फूट क्षेत्राचे दोन प्लॉट विकत घेतले. त्यानंतर त्याने आपला पूर्णाकृती पुतळा बनविण्याचे काम एका शिल्पकाराला दिले. त्याचा एक लाख रुपये मोबदलाही दिला. नल्लातंबीने खरेदी केलेल्या जमिनीत तो पुतळा चौथऱ्यावर बसविण्यात आला
आहे.
स्वप्नपूर्तीसाठी
पैसा ठेवला राखून
कचरावेचक नल्लातंबीबरोबर काम करणाºया मणिकम या मजुराने सांगितले की, त्याला आपला पूर्णाकृती पुतळा स्वत:च्या जमिनीमध्ये उभारायचा होता. त्याचे नाव कमाविण्याचे स्वप्न नल्लातंबीने अशा रीतीने पूर्ण केले. त्यासाठीच त्याने आयुष्यभराची कमाई राखून ठेवली होती. त्यातील एकही पैसा तो कोणाला देत नसे. ध्येय साध्य झाल्याने नल्लातंबी खूप आनंदी आहे.