"कॅमेऱ्यासमोर जाण्याच्या नादात त्यांनी..."; विद्यापीठाने 'रोबो डॉग' वादाचे महिला प्रोफेसरवर फोडले खापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 20:15 IST2026-02-18T20:11:18+5:302026-02-18T20:15:44+5:30
Galgotias University Apologises:'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये चिनी बनावटीचा रोबोट स्वतःचा असल्याचे सांगून देशाला पेचात टाकणाऱ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीने ...

"कॅमेऱ्यासमोर जाण्याच्या नादात त्यांनी..."; विद्यापीठाने 'रोबो डॉग' वादाचे महिला प्रोफेसरवर फोडले खापर
Galgotias University Apologises:'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये चिनी बनावटीचा रोबोट स्वतःचा असल्याचे सांगून देशाला पेचात टाकणाऱ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीने अखेर या प्रकरणावर अधिकृत माफीनामा जाहीर केला आहे. "इनोव्हेशनला चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता," असे स्पष्टीकरण देत युनिव्हर्सिटीने या संपूर्ण प्रकाराचे खापर तिथे उपस्थित असलेल्या प्रोफेसरवर फोडले आहे.
नेमकी चूक काय झाली? युनिव्हर्सिटीचे स्पष्टीकरण
गलगोटिया युनिव्हर्सिटीने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एक प्रेस रिलीज प्रसिद्ध केले. "पव्हेलियनमध्ये उपस्थित असलेल्या युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधीला उत्पादनाच्या तांत्रिक माहिती नव्हती. कॅमेऱ्यासमोर येण्याच्या उत्साहात त्या प्रतिनिधीने चुकीची माहिती दिली. विशेष म्हणजे, त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी अधिकृतपणे नियुक्तही करण्यात आले नव्हते. हा प्रकार म्हणजे एक मानवी चूक असून, शैक्षणिक पारदर्शकता जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असं
युनिव्हर्सिटीने सांगितले.
प्रोफेसर नेहा सिंह यांच्यावर ठपका
या वादाचे केंद्र ठरलेल्या प्रोफेसर नेहा सिंह यांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ओरियन नावाचा रोबो डॉग दाखवला होता. हा रोबो गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, नेटकऱ्यांनी हा रोबो चीनच्या यूनिट्री रोबोटिक्स कंपनीचा यूनिट्री जीओ२ असल्याचे पुराव्यासह सिद्ध केले. यामुळे सोशल मीडियावर युनिव्हर्सिटीवर टीकेचा वर्षाव झाला.
देशाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप; स्टॉल हटवला
भारताच्या तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय समिटमध्ये चिनी उत्पादनाला स्वदेशी सांगणे ही देशासाठी मोठी लाजिरवाणी बाब मानली जात आहे. हा वाद वाढल्यानंतर आयोजकांनी गलगोटिया युनिव्हर्सिटीला तात्काळ स्टॉल खाली करण्याचे निर्देश दिले.
आयोजकांच्या सूचनेनंतर युनिव्हर्सिटीने तिथून आपले सर्व साहित्य हटवले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी युनिव्हर्सिटी प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आश्वासन दिले आहे. यापुढे केवळ अधिकृत अधिकारीच माध्यमांशी संवाद साधतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.