गजेंद्र चौहान यांचा ‘सीव्ही’ केवळ एका परिच्छेदाचा !

By Admin | Updated: August 2, 2015 22:40 IST2015-08-02T22:40:16+5:302015-08-02T22:40:16+5:30

पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’(एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती वादात सापडली असतानाच

Gajendra Chauhan's 'CV' only one paragraph! | गजेंद्र चौहान यांचा ‘सीव्ही’ केवळ एका परिच्छेदाचा !

गजेंद्र चौहान यांचा ‘सीव्ही’ केवळ एका परिच्छेदाचा !

नवी दिल्ली : पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’(एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती वादात सापडली असतानाच, केवळ एका परिच्छेदाच्या बायोडाटाच्या आधारावर या नामांकित संस्थेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल अर्जाच्या उत्तरादाखल माहिती व प्रसारण मंत्रालयाने फाईल नोटिंगची प्रत उपलब्ध करून दिली आहे. गजेंद्र चौहान अभिनेते आहेत. ‘महाभारत’ या टीव्ही वाहिनीवरील मालिकेत पांडवांचे सर्वात मोठे बंधू ‘युधिष्ठिर’ची त्यांनी वठविलेली भूमिका अत्यंत गाजली होती. सुमारे १५० चित्रपट आणि ६०० टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे, अशी केवळ एका परिच्छेदाची माहिती या फाईल नोटिंगमध्ये आहे.
चौहान यांची ज्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या आधारावर एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, तिच्याबाबत अर्जदाराने माहिती मागितली होती. त्याच्या उत्तरादाखल मंत्रालयाने रेकॉर्डस् उपलब्ध करून दिले आहे. अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू विनोद चोपडा, राजू हिराणी, जया बच्चन, रमेश सिप्पी,आमिर खान, गोविंद निहलानी अशा नावांचाही एफटीआयआय प्रमुखपदासाठी विचार करण्यात आला. मात्र यांच्यापैकी गजेंद्र चौहान यांची निवड करण्यात आली, असे मंत्रालयाने म्हटले आहे. या माहितीसोबत चौहान यांचा केवळ एका परिच्छेदाचा बायोडाटा जोडला आहे. या एका परिच्छेदाच्या बायोडाटाव्यतिरिक्त मंत्रालयाने त्यांची कामे आणि उपलब्धींबाबत दुसरी कुठलीही माहिती पुरविलेली नाही. अनेक दिग्गजांच्या नावांमधून गजेंद्र चौहान यांचीच नियुक्ती का करण्यात आली, याला उत्तर देण्याचेही मंत्रालयाने टाळले आहे. चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी प्रखर आंदोलन उभारले आहे.

अभिनेते अनुपम खेर, रणबीर कपूर, सलमान खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Web Title: Gajendra Chauhan's 'CV' only one paragraph!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.