ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची पीओकेमध्ये अंत्ययात्रा; पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचा हात असल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:18 IST2025-08-03T16:17:04+5:302025-08-03T16:18:37+5:30
पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या ताहिरची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची पीओकेमध्ये अंत्ययात्रा; पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचा हात असल्याचे उघड
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन महादेवमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. अशातच ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवादी ताहिरची अंत्ययात्रा पाकव्याप्त काश्मीरमध्ये काढण्यात आल्याची माहिती समोर आली. यावरून पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध झालं आहे. २६ जणांचा बळी घेणाऱ्या पहलगाम हल्ल्यात ताहिरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २२ जुलै रोजी पॅरा ४ चे जवान, सीआरपीएफच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
या कारवाईत ताहिर नावाचा दहशतवादी देखील ठार झाला होता. त्यानंतर आता रावलकोटच्या खाई गाला गावात ताहिरचा 'जनाजा-ए-गयाब' काढण्यात आला. 'जनाजा-ए-गयाब' ही अंतिम संस्कार करण्याची एक पद्धत आहे, जी मृतदेह नसताना केली जाते. ताहिर हा माजी पाकिस्तानी सैनिक होता. नंतर तो लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फोटोंमध्ये आणि व्हिडिओंमध्ये कुटुंबातील सदस्य आणि गावकरी ताहिरच्या अंतिम नमाजासाठी एकत्र जमलेले दिसत होते.
स्थानिक लष्कर कमांडर रिझवान हनीफनेही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण ताहिरच्या कुटुंबाने लष्कर सदस्यांना उपस्थित राहण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. हनीफने आग्रह धरला, ज्यामुळे परिस्थिती चिघळली. लष्करच्या दहशतवाद्यांनी गावकऱ्यांना बंदुकांनी धमकावले. यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. यानंतर, लष्कर कमांडरला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि तो तिथून निघून गेला.
ताहिरच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. गावकरी दहशतवादी भरतीचा निषेध करण्याची आणि दहशतवाद्यांवर सार्वजनिक बहिष्कार टाकण्याची योजना आखली आहे. पीओकेमधील लोकांनी उघडपणे दहशतवादाचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. यानंतर, सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव सुरू केले ज्यामध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ताहिरचाही समावेश होता. भारताने ताहिरला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते. पाकिस्तानी सैन्यात भरती होण्यापूर्वी तो पाकिस्तानी विद्यार्थी संघटना इस्लामी जमियत तलाबा आणि स्टुडंट लिबरेशन फ्रंटशी संबंधित होता. ताहिर सदोजाई पठाण समुदायाचा आहे. हा समुदाय १८ व्या शतकात अफगाणिस्तानातून येथे आला आणि स्थायिक झाला. म्हणूनच ताहिरला 'अफगाणी' हे टोपणनाव मिळाले होते.