फुलनदेवी हत्याकांड; शेरसिंह राणाला जन्मठेप
By Admin | Updated: August 15, 2014 00:10 IST2014-08-14T23:30:49+5:302014-08-15T00:10:00+5:30
दरोडेखोर ते खासदार असा प्रवास करणाऱ्या फुलनदेवी यांच्या हत्येप्रकरणातील एकमेव दोषी शेरसिंह राणा याला गुरुवारी येथील न्यायालयाने जन्मठेप तसेच एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली़

फुलनदेवी हत्याकांड; शेरसिंह राणाला जन्मठेप
नवी दिल्ली : दरोडेखोर ते खासदार असा प्रवास करणाऱ्या फुलनदेवी यांच्या हत्येप्रकरणातील एकमेव दोषी शेरसिंह राणा याला गुरुवारी येथील न्यायालयाने जन्मठेप तसेच एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली़
अतिरिक्त सत्र न्यायाधीश भरत पाराशर यांनी भरगच्च न्यायालयात आपला निकाल सुनावला़ यावेळी राणाचे कुटुंबीय तसेच त्याचे काही समर्थक हजर होते़ भादंविच्या कलम ३०२/३४ आणि कलम ३०७ अशा दोन गुन्ह्यांसाठी त्याला वेगवेगळी जन्मठेप तसेच प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला़ दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येक प्रकरणात त्याला आणखी सहा महिने कारावास भोगावा लागेल़ न्यायाधीशांनी निकाल ऐकवताच, राणाचे कुटुंबीय तसेच समर्थकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
यापूर्वी ८ आॅगस्टला न्यायालयाने राणाला दोषी ठरवत, अन्य १० सह आरोपींची निर्दोष सुटका केली होती़ १९८० च्या दशकात दरोडेखोर फुलनदेवीची चंबळच्या खोऱ्यात प्रचंड दहशत होती़ यानंतर आत्मसमर्पण करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला़ १९९६ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या़ (लोकमत न्यूज नेटवर्क)