Hathras Case: बलात्कारानंतर ११ दिवसांच्या नमुन्यांवर फॉरेन्सिक रिपोर्ट निरर्थक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:45 IST2020-10-06T02:06:26+5:302020-10-06T06:45:29+5:30
Hathras Gangrape Case: जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचा दावा

Hathras Case: बलात्कारानंतर ११ दिवसांच्या नमुन्यांवर फॉरेन्सिक रिपोर्ट निरर्थक
लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर अकरा दिवसांनी फॉरेन्सिक परीक्षणासाठी नमुने गोळा करण्यात आले होते. त्यामुळे त्यावर आधारित फॉरेन्सिक अहवाल निरर्थक ठरतो, असे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अझीम मलिक यांनी म्हटले आहे.
दलित मुलीवर बलात्कार झालेला नाही असे उत्तर प्रदेशचे पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे सांगत आहेत. बलात्काराची घटना घडल्यानंतर ९६ तासांच्या आत तपासणीसाठी गोळा केलेल्या नमुन्यांतच खरा पुरावा सापडू शकतो, असे याबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. त्यामुळे ११ दिवसांनंतर गोळा केलेल्या नमुन्यांच्या आधारे तयार केलेला अहवाल विश्वासार्ह ठरत नाही, असेही डॉ. अझीम मलिक यांनी सांगितले.
बलात्काराची घटना उजेडात आल्यानंतर दलित मुलीवर जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दोन आठवडे उपचार सुरू होते. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या दलित मुलीला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेचा शवचिकित्सा अहवालही सफदरजंग रुग्णालयानेच तयार केला होता. दलित मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसने विविध राज्यांत जिल्हास्तरावर निदर्शने केली.
आपचे नेते संजय सिंह यांच्यावर शाई फेकली
हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीच्या गावी जाऊन तिच्या नातेवाईकांना भेटल्यानंतर आप पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या अंगावर एका व्यक्तीने शाई फेकली. त्यांना काळे फासण्याचा या हल्लेखोराचा इरादा होता. मात्र, त्यातून संजय सिंह बचावले. सुरक्षा रक्षकांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. शाई फेकणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
हे तर बदनामी व सरकार पाडण्याचे कारस्थान
लखनौ : काही लोक माझे सरकार पाडण्याचे व भाजप कार्यकर्त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान रचत आहेत. त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत आणि विद्वेष पसरवायचा आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस घटनेनंतर विरोधकांवर केला.
काँग्रेस व समाजवादी पक्षाने हा आरोप फेटाळून लावला. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात योगी सरकार पूर्णत: अयशस्वी ठरले आहे आणि महिलांवर अत्याचार वाढत आहेत. हे अपयश लपविण्यासाठी योगी आदित्यनाथ खोट्यानाट्या बातम्या पसरवीत आहेत, अशी टीका या दोन्ही पक्षांनी केली.