फेसबुकवरील मैत्री १ कोटी ३० लाखाला महाग पडली
By Admin | Updated: July 23, 2014 04:23 IST2014-07-23T04:23:41+5:302014-07-23T04:23:41+5:30
वृध्दाश्रम उघडण्यासाठी ९ कोटी रुपये देतो. असे सांगत एका ठगाने बिना बोर ठाकूर या महिलेला तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांना गंडा घातला आहे.

फेसबुकवरील मैत्री १ कोटी ३० लाखाला महाग पडली
देहरादून, दि.23 - वृध्दाश्रम उघडण्यासाठी ९ कोटी रुपये देतो. असे सांगत एका ठगाने बिना बोर ठाकूर या महिलेला तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांना गंडा घातला आहे. ओएनजीसी या कंपनीतील कर्मचा-याची पत्नी असलेल्या बिना यांनी फेसबुकवर रिचर्ड अँडर्सन नावाच्या व्यक्तीशी मैत्री केली. रिचर्डने आपण भारतात वृध्दाश्रम उघडणार असल्याचे सांगितले. तसेच इतर सामाजिक उपक्रमांसाठीही तो माझ्याकडे सल्ला मागत असल्याचे बिना ठाकूर यांनी सांगितले.
रिचर्ड अँडरसन हा बिना यांच्यासोबत फोनवरून तसेच फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात होता. तसेच त्याची व बिना ठाकूर यांची ओळख नोव्हेंबर २०१३ पासून असल्याने बिनाने त्याच्यावर विश्वास ठेवला.
काही दिवसांनी बिना यांना एक फोन आला त्या व्यक्तीने आपण रिझर्व बँकेच्या फॉरेन एक्सचेंज ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगत त्यांना देण्यात येणा-या रकमेवर टॅक्स भरण्यास सांगितले. त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे बिना यांनी बँक खात्यात पैसे भरले. पुन्हा काही दिवसांनी दोन व्यक्तींनी बिना यांना फोन केला त्यांनी आपली नावे विल्यम जॉर्ज आणि केव्हिन ब्राऊन असल्याचे सांगितले. तसेच या दोघांनी त्यांना आणखी पैसे भरण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार बिना यांनी आत्तापर्यंत २५ वेगवेगळ्या बँक अकाऊंट मध्ये तब्बल १ कोटी ३० लाख रुपये भरले होते. कालांतराने बिना ठाकूर यांना आपल्याला फसवल्याचा संशय आला व त्यांनी पोलिसात धाव घेतली असल्याचे वरीष्ठ पोलीस अधिक्षक अजय रौतेला यांनी सांगितले.
संबंधीत गुन्हेगारांवर कलम ४२० भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक व्हि.के. जेठा यांनी सांगितले. तसेच तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतील काही बँकेत ही खाती खोट्यानावाने उघडली असल्याचेही त्यांनी सांगितले.