सरकारकडून फुकट मिळणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात- हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 20:25 IST2018-11-23T20:24:14+5:302018-11-23T20:25:40+5:30
सरकार मोफत वस्तू देत असल्यानं लोक सरकारवर अवलंबून राहतात- कोर्ट

सरकारकडून फुकट मिळणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात- हायकोर्ट
चेन्नई: मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात, असं मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ दिला जावा, अशी सूचना न्यायालयानं केली. सरकार मोफत अन्नधान्य देत असल्यानं लोक आळशी होतात, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.
'गरिबांना, गरजूंना तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तू देणं आवश्यक आहे. सरकारकडून या वस्तू दिल्या गेल्यास त्याबद्दल आक्षेप नाही. आधीच्या सरकारांनी राजकीय लाभासाठी अशाप्रकारे सर्व आर्थिक गटातील लोकांना मोफत वस्तू दिल्या,' असं न्यायमूर्ती एन. किरुबाकरण आणि न्यायमूर्ती अब्दुल कुद्दूस यांच्या खंडपीठानं म्हटलं. 'आधीच्या सरकारांनी लोकांना फुकटात वस्तू दिल्या. त्यामुळे सरकारकडून सर्वकाही मोफत मिळवण्याची सवय लोकांना लागली. यामुळे लोक आळशी झाले. ते लहानसहान गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून राहू लागले,' असं खंडपीठानं म्हटलं. एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. राज्यातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना शिधावाटप पत्रिकेच्या माध्यमातून मोफत तांदूळ दिला जातो, अशी माहिती यावेळी राज्य सरकारनं न्यायालयाला दिली.