दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत चार मजली इमारत कोसळली. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत अनेक लोक उपस्थित होते, त्यापैकी अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ६ जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ५ ते ६ जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मदत आणि बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. हा परिसर खूप दाट लोकवस्तीचा असल्याने आणि अरुंद रस्ते असल्याने बचावकार्य अवघड आहे.
घटनास्थळी ७ अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित आहेत आणि स्थानिक पोलीस आणि टीम ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. दुर्घटनेमागेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही परंतु इमारत खूपच जीर्ण असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामुळे ही दुर्घटना घडली.