थंडीचे आणखी ४ बळी
By Admin | Updated: December 23, 2014 00:47 IST2014-12-23T00:47:35+5:302014-12-23T00:47:35+5:30
संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढली असून उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अपघात होऊन तीन जण मृत्युमुखी पडले

थंडीचे आणखी ४ बळी
नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढली असून उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अपघात होऊन तीन जण मृत्युमुखी पडले. शेजारच्या उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमवृष्टीचा परिणाम उत्तर प्रदेशातही दिसून आला. राजस्थानात थंडीमुळे एकाचा मृत्यू झाला. या राज्यात अनेक शहरांमध्ये दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
उत्तर प्रदेशातील सहस्वान भागात दिल्लीला जाणाऱ्या बसवर ट्रॅक्टर ट्रॉली आदळून अनेक जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातात बदायूँ येथे दोघे ठार झाले. राजस्थानमध्ये थंडी आणि दाट धुुक्यामुळे विमान आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. दुबई, मस्कत, शारजाला जाणारी आंतरराष्ट्रीय विमाने आणि देशांतर्गत सहा उड्डाणे रद्द करण्यात आली. उत्तर-पश्चिम रेल्वेच्या २३ रेल्वे विलंबाने धावत असल्याचे वृत्त जयपूरहून मिळाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)