चकमकीत चार जवान शहीद;जम्मूृ-काश्मीरच्या मछीलमध्ये तीन अतिरेक्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 07:00 IST2020-11-09T01:18:19+5:302020-11-09T07:00:51+5:30
शहीद झालेल्या चौघांमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे.

चकमकीत चार जवान शहीद;जम्मूृ-काश्मीरच्या मछीलमध्ये तीन अतिरेक्यांचा खात्मा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील मचील क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव सुरक्षा दलाने रविवारी पहाटे हाणून पाडला. त्यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे चार जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले. तसेच सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
शहीद झालेल्या चौघांमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. मात्र अद्याप त्यांच्याबद्दल अधिक तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. कुपवाडा जिल्ह्यातील मचील भागात रविवारी पहाटे सीमेपलीकडून काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला. त्यावेळी दहशतवाद्यांशी कडवी झुंज देताना लष्कराचा एक अधिकारी, दोन जवान व सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान असे चार जण शहीद झाले. गेल्या काही महिन्यांत काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. काश्मीरमध्ये अशांतता माजविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सातत्याने सुरूच आहेत. (वृत्तसंस्था)
काही तास चालली चकमक
लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, सीमेपलीकडून काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरक्षा दलांच्या जवानांनी त्यांना रोखले. त्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये काही तास चकमक झाली.