जिल्हा परिषदेत आढळले ८७ लेटलतिफ
By Admin | Updated: March 24, 2015 23:41 IST2015-03-24T23:07:06+5:302015-03-24T23:41:50+5:30
सात शाखा अभियंत्यांसह ८ कार्यालयीन अधीक्षकांचा समावेश

जिल्हा परिषदेत आढळले ८७ लेटलतिफ
सात शाखा अभियंत्यांसह ८ कार्यालयीन अधीक्षकांचा समावेश
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कर्मचार्यांना शिस्त लागण्याच्या उद्देशाने मंगळवारी (दि.२४) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी केलेल्या अचानक तपासणीत तब्बल ८७ कर्मचारी व अधिकारी लेटलतिफ आढळले. त्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सुखदेव बनकर यांनी दिली.
दरम्यान, या लेटलतिफांमध्ये सात शाखा अभियंत्यांसह आठ कार्यालयीन अधीक्षकांचा समावेश असून, त्यात कृषी (२), इवद विभाग दोन (२) तसेच ग्रामपंचायत, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी विभाग, आरोग्य विभाग विभागातील प्रत्येकी एक कार्यालयीन अधीक्षक लेटलतिफ आढळले आहेत. तसेच पाच सहायक लेखा अधिकारी त्यात सर्व शिक्षा अभियान, लेखा विभाग, महिला व बालकल्याण विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अभियान विभाग व शिक्षण विभागातील लेखा अधिकार्यांचा समावेश आहे. एक पशुधन पर्यवेक्षक, एक कनिष्ठ लेखा अधिकारी यांच्यासह तब्बल ८७ कर्मचारी उशिरा आल्याचे सुखदेव बनकर यांना जिल्हा परिषदेच्या दुसर्या क्रमांकाच्या गेटवर तपासणीत आढळून आले. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड होते. या सर्व लेटलतिफ कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून दोन दिवसांत खुलासा मागविण्यात येणार आहे. त्यांचा खुलासा समाधानकारक न आल्यास किंवा अप्राप्त राहिल्यास त्यांचे चार दिवसांनंतर एक दिवसाचे विना वेतन करून त्याची सेवापुस्तकात नोंद घेण्याचे आदेश सुखदेव बनकर यांनी दिले आहेत.(प्रतिनिधी)