Pandit Sukh Ram Died: अर्पिता खानचे आजे सासरे, माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 07:44 IST2022-05-11T07:40:01+5:302022-05-11T07:44:38+5:30
सुखराम शर्मा 1993-1996 मध्ये केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते. ते मंडी (हिमाचल प्रदेश) येथून लोकसभेचे खासदार होते.

Pandit Sukh Ram Died: अर्पिता खानचे आजे सासरे, माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे निधन
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पंडित सुखराम शर्मा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सात मे पासून ते दिल्लीच्या एम्समध्ये व्हेंटिलेटरवर होते.
सुखराम यांना चार मे रोजी ब्रेन स्ट्रोक आला होता. यामुळे त्यांवना हिमाचल प्रदेशच्या मंडीमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून दिल्लीला आणण्यात आले. सुखराम शर्मा यांचा नातू आश्रय शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली.
सुखराम शर्मा 1993-1996 मध्ये केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते. ते मंडी (हिमाचल प्रदेश) येथून लोकसभेचे खासदार होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत सुख राम यांनी पाच वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. आता सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा हे मंडीतून भाजपचे आमदार आहेत.
सुखराम यांना मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी २०११ मध्ये पाच वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती. 1996 मध्ये अनिल शर्मा यांचे नाव टेलिकॉम घोटाळ्यात आल्याने त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल यांनी हिमाचल विकास काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या पक्षाची भाजपासोबत युती होती. अखेर २०१७ मध्ये भाजपात गेले होते. परंतू, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुखराम आणि आश्रय या दोघांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आश्रय लोकसभा निवडणूक हरले. सुखराम यांचा दुसरा नातू आयुष शर्मा याचे सलमान खान याची बहीण अर्पिता खानसोबत लग्न झाले आहे.