रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकांना ठरविले दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:14 IST2019-11-16T06:14:09+5:302019-11-16T06:14:19+5:30
फोर्टिस हेल्थ केअरमधील आपला हिस्सा विकू नका, या आदेशाचे पालन न करून रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर व शिविंदर सिंग यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे,

रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकांना ठरविले दोषी
नवी दिल्ली : फोर्टिस हेल्थ केअरमधील आपला हिस्सा विकू नका, या आदेशाचे पालन न करून रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर व शिविंदर सिंग यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असा ठपका ठेवत याप्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. दायची सानक्यो या कंपनीला भरपाईपोटी ३५०० कोटी रुपये द्यावेत, असा आदेश सिंगापूर लवादाने सिंगबंधूंना दिला होता. ही रक्कम कशी अदा करणार याचा तपशील सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सिंगबंधूंना दिला होता. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल मालविंदरसिंग व शिविंदरसिंग यांना सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या समावेश असलेल्या खंडपीठाने दोषी ठरविले. फोर्टिस ग्रुपमधील आपला हिस्सा मलेशियातील आयएचएच हेल्थ केअर कंपनीला विकण्यास सिंगबंधूंना सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली होती; पण तो आदेश न पाळणाऱ्या सिंगबंधूंना लवकरच शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
फोर्टिस ग्रुपमधील आपला हिस्सा मालविंदर व शिविंदरसिंह यांनी मलेशियाच्या कंपनीला विकून त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार दायची सानक्यो या जपानी कंपनीने एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली होती. सिंगबंधूंकडून आपल्याला भरपाई मिळण्याची शक्यता धूसर झाल्याचे या कंपनीने याचिकेत म्हटले होते. रॅनबॅक्सी ही कंपनी दायची सानक्योने २००८ साली विकत घेतली.
>जपानी कंपनीच्या बाजूने लवादाचा निर्णय
रॅनबॅक्सीची अमेरिकेच्या अन्न व औषध खाते, विधि विभागाकडून चौकशी सुरू आहे, ही माहिती सिंगबंधूंनी स्वत:चा हिस्सा विकताना आमच्यापासून लपवून ठेवली, असा आरोप करीत दायची सानक्योने सिंगापूरच्या लवादाकडे दाद मागितली होती.
या व्यवहारानंतर दायची सानक्योला विधि विभागाकडे ५० कोटी डॉलरचा दंड भरावा लागला होता. त्यानंतर दायचीने सिंगबंधूंचा रॅनबॅक्सीमधील हिस्सा सन फार्मास्युटिकल्स कंपनीला २०१५ साली विकला. या प्रकरणात सिंगापूर लवादाने दायची सानक्योच्या बाजूने निकाल दिला होता.