‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतात पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी काम करणाऱ्या एजंट्सचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या आहेत. अशाच मोहिमेअंतर्गत राजस्थानच्या जैसलमेरमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या शकूर खान याला भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.
कोण आहे शकूर खान?शकूर खान सध्या जैसलमेरच्या रोजगार विभागात कार्यरत होता. मात्र, तपासात हे देखील उघड झाले आहे की, तो माजी कॅबिनेट मंत्री शाले मोहम्मद यांचा खाजगी सचिव देखील होता. तो गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता आणि संवेदनशील माहिती त्यांच्यासोबत शेअर करत होता.
सुरक्षा यंत्रणांना याबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. अखेर, पुरेसे पुरावे गोळा झाल्यानंतर बुधवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. सध्या त्यांना पुढील चौकशीसाठी जयपूरला नेण्यात आले आहे.
हेरगिरीच्या इतर घटनाही उघडजैसलमेर जिल्ह्यात याआधीही पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अनेकांना अटक करण्यात आली आहे. सीमावर्ती भागातील माहिती पाकिस्तानला देणारा एजंट पठाण खानला जैसलमेरमधून अटक करण्यात आली होती.
ज्योती मल्होत्रा आणि सहदेव गोहिल यांच्यावरील गंभीर आरोप‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला समर्थन दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.
तसेच, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सहदेव सिंग गोहिल याला अलीकडेच अटक करण्यात आली. त्याच्यावर व्हॉट्सअॅपद्वारे बीएसएफ व नौदलाशी संबंधित माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे.