मनमोहनसिंगांनी अर्धवट सोडले होते पूर्व वैद्यकीय शिक्षण
By Admin | Updated: August 18, 2014 03:19 IST2014-08-18T03:19:27+5:302014-08-18T03:19:27+5:30
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या पित्याची इच्छा होती आणि पित्याच्या या इच्छेखातर त्यांनी पूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता़

मनमोहनसिंगांनी अर्धवट सोडले होते पूर्व वैद्यकीय शिक्षण
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या पित्याची इच्छा होती आणि पित्याच्या या इच्छेखातर त्यांनी पूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता़; पण काहीच महिन्यांत याविषयात रुची नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी हे शिक्षण अर्धवट सोडून नवी वाट धरली़ खुद्द मनमोहनसिंग यांच्या कन्या दमन सिंह यांनी आपल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन अॅण्ड गुरशरण’ या पुस्तकात ही माहिती दिली आहे़ दमन यांनी या पुस्तकात आपल्या माता-पित्याच्या दाम्पत्य जीवनावर प्रकाश टाकला आहे़ अर्थात या पुस्तकात संपुआ सरकारच्या कार्यकाळात मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या गत १० वर्षांतील घटनांचा कुठलाही उल्लेख नाही़
आपल्या पित्याची विनोदबुद्धी अतिशय चांगली आहे़,असेही त्यांनी पुस्तकात म्हटले आहे़ एप्रिल १९४८ मध्ये मनमोहनसिंग यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेजात प्रवेश घेतला होता़
आपला मुलगा डॉक्टर व्हावा, असे मनमोहनसिंगांच्या वडिलांना वाटत होते़ वडिलांच्या इच्छेचा मान राखत मनमोहनसिंगांनी दोन वर्षांच्या एफएससी अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला होता़ मात्र काहीच महिन्यांत आपण डॉक्टर बनू शकणार नाही, हे मनमोहनसिंगांना कळून चुकले व त्यांनी हे शिक्षण अर्धवट सोडले़ यानंतर ते आपल्या पित्याच्या दुकानात बसू लागले़ पण समान वागणूक मिळत नाही, म्हणून मनमोहनसिंगांना तेही नकोसे झाले़
लहान म्हणून सर्वजण त्यांना चहा, पाणी आणायला पिटाळत असत, हे त्यांना खटकत असे़ तेव्हा दुकानात न बसता पुन्हा शिकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि हिंदू कॉलेजात प्रवेश घेतला़ येथे अर्थशास्त्राकडे त्यांचा ओढा वाढला़ काही देश गरीब, काही देश श्रीमंत का, असा एक प्रश्न मनमोहनसिंगांना नेहमी छळायचा़ या प्रश्नांची उत्तरे त्यांना अर्थशास्त्रात गवसली, असे दमन यांनी आपल्या पुस्तकात पित्याच्या हवाल्याने लिहिले आहे़