बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम कृष्णा यांचं निधन झालं आहे. पहाटे २.४५ मिनिटांनी बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एस.एम कृष्णा यांचा जन्म १९३२ साली झाला होता. त्यांचे पूर्ण नाव सोमनाहल्ली मल्लैया कृष्णा असं होते. १९९९ ते २००४ या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. २००४ ते २००८ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केले. २००९ साली एस.एम कृष्णा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होते.
मार्च २०१७ साली एस.एम कृष्णा यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला. २०२३ साली केंद्र सरकारने एस.एम कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. एस.एम कृष्णा यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर बंगळुरू येथे सरकारी कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. उच्च शिक्षणासाठी ते पुढे अमेरिकेत गेले. तिथून परतल्यानंतर ते भारतीय राजकारणात सक्रीय झाले. १९६२ साली ते पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. कर्नाटकच्या मांड्या लोकसभा मतदारसंघातून ते अनेकदा विजयी झाले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले. १९८३-८४ मध्ये इंदिरा गांधी आणि १९८४-८५ च्या राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते उद्योग आणि अर्थ राज्यमंत्री होते.
कसा होता राजकीय प्रवास?
१९६२ साली एस.एम कृष्णा हे कर्नाटकच्या मद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. जिंकल्यानंतर त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीत प्रवेश घेतला. १९६८ साली मांड्या लोकसभा पोटनिवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर कृष्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९७१ साली मांड्या लोकसभा मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले. १९८५ मध्ये ते पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले. तिथे १९९९ ते २००४ पर्यंत कर्नाटकात ते मुख्यमंत्री राहिले. डिसेंबर २००४ ते २००८ काळात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. जानेवारी २०२३ मध्ये एस.एम कृष्णा यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
दरम्यान, एस.एम कृष्णा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एस.एम कृष्णा यांनी त्यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होते. कर्नाटकात मुख्यमंत्री असताना त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले होते. गेल्या अनेक वर्षात मला एस.एम कृष्णा यांच्याशी संवाद साधण्याची अनेकदा संधी मिळाली. त्या चर्चा कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्यानं मला खूप दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत असं मोदींनी ट्विट करून म्हटलं.