जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 06:44 IST2025-08-02T06:41:18+5:302025-08-02T06:44:10+5:30
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा न्यायालयाच्या निकालानंतर रडला

जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
बंगळुरू : येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी (दि. १) जनता दल (सेक्युलर)चे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला चार लैंगिक शोषण व बलात्कार प्रकरणांपैकी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट हे शनिवारी (२ ऑगस्ट) त्याला शिक्षा सुनावणार आहेत. न्यायालयाचा निकाल आला तेव्हा रेवण्णा भावुक झाला आणि बाहेर पडताना रडताना दिसला.
रेवण्णा याच्या कुटुंबाच्या फार्महाउसमध्ये काम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली होता. तिने रेवण्णा यांच्यावर २०२१ पासून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.
रेवण्णावर बलात्कार, धमकी देणे आणि अश्लील फोटो लीक करणे अशा कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी सेक्स स्कॅण्डलमध्ये समोर आल्यानंतर रेवण्णाचे नाव चर्चेत आले होते. त्याच्यावर ५०हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
काय आहेत नेमके आरोप?
या प्रकरणात एसआयटीने १,६३२ पानांचे आरोपपत्र सादर केले होते. त्यामध्ये ११३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. प्रज्वल याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या खालील कलमांखाली गुन्हे दाखल होते: कलम ३७६(२)(के) : तुम्ही एखाद्या महिलेवर नियंत्रण किंवा वर्चस्वाच्या स्थितीत असताना तिच्यावर बलात्कार करणे, कलम ३७६(२)(एन) – एकाच महिलेसोबत वारंवार बलात्कार करणे, कलम ३५४अ – लैंगिक छळ, कलम ३५४ब – एखाद्या महिलेला निर्वस्त्र करण्याच्या हेतूने केलेला हल्ला, कलम ३५४सी – (दुसऱ्याच्या खासगी क्षण चोरून बघणे), कलम ५०६ हत्याेची धमकी, कलम २०१ – पुरावे नष्ट करणे, शिवाय कलम ६६ई (गोपनीयतेचा भंग) अंतर्गतही गुन्हा दाखल होता.
५,००० अश्लील व्हिडीओ क्लिप
रेवण्णाच्या तीन ते ५,०००हून अधिक अश्लील व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर समोर आल्या. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती.
वकील म्हणाले...
विशेष सरकारी वकील अशोक नायक यांनी सांगितले की, त्यांनी २६ साक्षीदारांची चौकशी केली. मुख्य पीडितेला न्यायालयाने अत्यंत विश्वासार्ह मानले... हे तिच्या लढ्याचं यश आहे. आम्ही केवळ मौखिक साक्ष्यांवर नव्हे, तर डिजिटल, तांत्रिक, डीएनए आणि फॉरेन्सिक अहवालांवरही भर दिला.
काय आहे सेक्स स्कॅण्डल?
प्रज्वल रेवण्णाच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्याच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली होती. २६ एप्रिल रोजी सार्वजनिक ठिकाणी अनेक पेन ड्राइव्ह आढळले.
पेन ड्राइव्हमध्ये ३,००० ते ५,००० व्हिडीओ होते यात प्रज्वल अनेक महिलांचे लैंगिक छळ करताना दिसत होता. महिलांचे चेहरेही ब्लअर नव्हते.
जेव्हा प्रकरण वाढले तेव्हा राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली. प्रज्वलविरुद्ध बलात्कार, छेडछाड, ब्लॅकमेलिंगचे एफआयआर दाखल .
एसआयटीने आपल्या तपासात उघड केले की प्रज्वलने ५०हून अधिक महिलांचे लैंगिक छळ केले होते. या महिला २२ ते ६१ वयोगटातील होत्या.
५० पैकी सुमारे १२ महिलांवर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला. उर्वरित महिलांवर आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यात आले.
रेवण्णाने काही महिलांना सब-इन्स्पेक्टर, काहींना तहसीलदार, तर काहींना अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी मिळवून दिल्याचेही तपासात समोर आले आहे.