"अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती";माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:51 IST2025-02-13T19:51:32+5:302025-02-13T19:51:50+5:30

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये अयोध्येच्या निकालावरुन भाष्य केलं.

Former CJI DY Chandrachud sit in front of God before the Ayodhya verdict | "अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती";माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट

"अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती";माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट

Former CJI DY Chandrachud: भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या कार्यकाळाबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. अयोध्या निकालाच्या वेळी आपण देवाजवळ का बसलो होतो, याबाबत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी गणेश पूजेसाठी बोलवल्याबद्दलही माजी सरन्यायाधिशांनी भाष्य केलं. या दोन्ही मुद्द्यांवरुन विरोधी राजकीय पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता धनंजय चंद्रचूड यांनी सगळ्या मुद्द्यांबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्या निर्णयापूर्वी मला मार्ग दाखवा अशी देवाकडे प्रार्थना करण्याबाबत मी कधीच बोललो नव्हतो असा खुलासा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर माजी सरन्यायाधिश चंद्रचूड यांनी, निर्णयापूर्वी मी या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी देवाला प्रार्थना केली होती, असं म्हटल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. काही वृत्तांमध्ये, मी देवासमोर बसलो आणि प्रार्थना केली की काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले होते असं सांगण्यात आलं होतं.

मात्र आता मुलाखतीमध्ये माजी सरन्यायाधिशांनी हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटलं आहे. "मी हे आधी स्पष्ट केले आहे आणि मी पुन्हा स्पष्ट करतो की हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तुम्हाला सोशल मीडियाद्वारे न्यायाधीशांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला चुकीचेच उत्तर मिळेल. मी धार्मिक व्यक्ती आहे हे मी नाकारत नाही. स्वतंत्र न्यायाधीश होण्यासाठी तुम्ही नास्तिक असायला हवे, अशी आमच्या राज्यघटनेची गरज नाही आणि मी माझ्या श्रद्धेचा आदर करतो. माझी श्रद्धा मला धर्माची सार्वत्रिकता शिकवते.  माझा धर्म सर्व धर्मांचा आदर करतो आणि माणूस कोणत्याही धर्मात आला तरी तुम्हाला समान न्याय द्यावा लागेल," असं माजी सरन्यायाधिश चंद्रचूड म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भेटीवरही केलं भाष्य

"संवैधानिक जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना मूलभूत शालीनतेला जास्त महत्त्व दिले जाऊ नये. मला वाटते की सर्वोच्च संवैधानिक पदे धारण करणाऱ्यांमध्ये मूलभूत शालीनतेचा खटल्याशी काहीही संबंध नाही हे समजून घेण्यासाठी आमची यंत्रणा पुरेशी परिपक्व आहे. भेटीपूर्वी, आम्ही इलेक्टोरल बाँड्ससारख्या विषयांवर निर्णय दिला होता, ज्यामध्ये आम्ही तो कायदा मोडून काढला होता. त्यानंतर आम्ही असे अनेक निर्णय दिले जे सरकारच्या विरोधात गेले," असं माजी सरन्यायाधिश म्हणाले.
 

Web Title: Former CJI DY Chandrachud sit in front of God before the Ayodhya verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.