रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने शनिवारी दुपारी येथील एका खासगी इस्पितळात दाखल केल्यापासून ते अजूनही कोमामध्येच आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रविवारी दुपारी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिननुसार ७४ वर्षांच्या जोगी यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून, आठ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांच्या मेंदूचे कार्य जवळजवळ थांबल्याची लक्षणे असल्याने पुढील ४८ तास अत्यंत काळजीचे आहेत. शनिवारी दुपारी जोगी यांनी त्यांच्या निवासस्थानी एक चिंचोका खाल्ला असता तो श्वासनलिकेत अडकून ते व्हीलचेअरमध्ये अचानक कोसळले होते. त्यावेळी ते बेशुद्ध होऊन त्यांच्या हृदयाचे ठोकेही काही काळ थांबले होते. पुरेशा आॅक्सिजन पुरवठ्याअभावी त्यांच्या मेंदूला सूज आली असून, त्यांचा सिटी स्कॅन काढला जाणार आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 05:30 IST