काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानावर सीबीआयने धाड टाकली आहे. रायपूर आणि भिलाई अशा दोन ठिकाणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच भूपेश बघेल यांच्या निवासस्थानाबाहेरी सीआरपीएफच्या जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच अधिकाऱ्यांकडून घराची झाडाझडती सुरू आहे.
याआधी १० मार्च रोजी ईडीच्या पथकाने भूपेश बघेल यांच्या निवासस्थानावर ईडीने धाड टाकली होती. आजच्या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांची टीम भिलाई आणि रायपूरमध्ये दाखल झाली आहे. महादेव बेटिंग अॅप, कोळसा आणि मद्य घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या कारवाईकडे पीएससी घोळाळ्याशी जोडूनही पाहिले जात आहे. दोन्ही प्रकरणात राज्य सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.
छत्तीसगडमधील विद्यमान सरकारने सीजीपीएससी, महादेव बेटिंग अॅप आणि बिरनपूर हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. दरम्यान, आज सीबीआयने भूपेश बघेल यांच्यासोबतच त्यांच्या काही निकटवर्तियांच्या घरीही धडक दिल्याचं वृत्त आहे. त्यामध्ये भिलाईचे आमदार देवेंद्र यादव यांच्या निवासस्थानीही धाड टाकण्यात आली आहे. आज सकाळीच सीबीआयचे अनेक अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. सध्या त्यांची प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.