केरळमध्ये तुफान पावसाचा अंदाज, तीन जिल्ह्यांत अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:20 IST2019-07-19T04:20:00+5:302019-07-19T04:20:11+5:30
केरळमध्ये आगामी काही दिवसांत नैर्ऋत्य मान्सून अधिक सक्रिय होणार असून, भारतीय हवामान खात्याने राज्यातील इडुकी, पथानमथिट्टा व कोट्टायम या तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे.

केरळमध्ये तुफान पावसाचा अंदाज, तीन जिल्ह्यांत अलर्ट
तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये आगामी काही दिवसांत नैर्ऋत्य मान्सून अधिक सक्रिय होणार असून, भारतीय हवामान खात्याने राज्यातील इडुकी, पथानमथिट्टा व कोट्टायम या तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. इडुकी जिल्ह्यात १८ ते २० जुलैदरम्यान, पथानमथिट्टा व कोट्टायम जिल्ह्यांत १९ जुलैसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात १९ जुलै रोजी तुफान पाऊस पडण्याचा अंदाज असून, तेथेही रेड अलर्ट जारी केला आहे.
जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असलेल्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. या अंतर्गत संवेदनशील भागांतील लोकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलविले जाते व त्यांना आपत्कालीन साहित्य पुरविले जाते. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यांमध्ये २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अद्याप रेड अलर्ट जारी केलेला नसला तरी तेथेही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अलपुझा जिल्ह्यात बुधवारी ६ सेंटीमीटर पाऊस झाला. (वृत्तसंस्था)
केरळ व लक्षद्वीपच्या किनारपट्टीवरील मासेमाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. वायव्येकडून ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असून, त्यामुळे मच्छीमारांना वरीलप्रमाणे सल्ला देण्यात आला आहे.
नैर्ऋत्य मान्सूनचे यंदा एक आठवडा उशिराने म्हणजेच ८ जून रोजी आगमन झाले. १५ जुलैपर्यंत ४६ टक्के कमी पाऊस पडला आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.