प्रथमच आमदार ते थेट सीएम; रामलीला मैदानात रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:21 IST2025-02-21T10:20:42+5:302025-02-21T10:21:38+5:30
प्रवेश वर्मा, मनजिंदर सिंग सिरसा, आशिष सूद, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि डॉ. पंकज कुमार सिंग हे हे कॅबिनेट मंत्री आहेत.

प्रथमच आमदार ते थेट सीएम; रामलीला मैदानात रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ
नवी दिल्ली : तब्बल २७ वर्षांनंतर दिल्ली विधानसभेत दमदार विजय मिळवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी दिल्लीच्या सातव्या आणि चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी गुप्ता यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली.
प्रवेश वर्मा, मनजिंदर सिंग सिरसा, आशिष सूद, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि डॉ. पंकज कुमार सिंग हे हे कॅबिनेट मंत्री आहेत.
दिल्ली विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांना पक्षाने थेट मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी मर्लोना या महिलांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. रेखा गुप्ता यांनी ‘आप’च्या वंदना कुमारी यांचा २९ हजार मतांनी पराभव करून शालीमारबागमधून विजय मिळविला होता. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात संपन्न झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
सोहळा ऐतिहासिक व्हावा म्हणून तीन वेगवेगळी व्यासपीठे
सोहळ्याला ऐतिहासिक बनविण्यासाठी तीन वेगवेगळी व्यासपीठे होती. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधान, नायब राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, रालोआचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदी उपस्थित होते.
दुसऱ्या व्यासपीठावर धार्मिक नेते आणि विशेष पाहुणे, तर तिसऱ्या व्यासपीठावर संगीतमय कार्यक्रमाशी संबंधित कलाकार उपस्थित होते.
मंत्र्यांचे शिक्षण काय?
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मेरठच्या चौधरी चरणसिंह विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे, तर आशिष सूद आणि रवींद्र इंद्रराज हे दोन मंत्री पदवीधर आहेत.
दोन मंत्री व्यावसायिक असून मनजिंदरसिंग सिरसा यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. पंकजकुमार सिंग डेंटिस्ट आहेत. कपिल मिश्रा यांनी सामाजिक शास्त्रात एमए केले आहे.
दिग्गजांची उपस्थिती
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह २१ राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपस्थितांची पंतप्रधान मोदी यांनी प्रत्यक्ष भेट घेत विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री रेखा गुप्ता पूर्ण क्षमतेने जबाबदारी निभावतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
२,५०० रुपये लवकरच
रेखा गुप्ता यांनी शपथ घेण्यापूर्वीच महत्त्वाच्या निर्णयांना हात घालत निर्णय घेण्यास प्रारंभ केला. महिलांना देण्यात येणाऱ्या मासिक २,५०० रुपयांची या महिन्याची रक्कम महिला दिनापर्यंत प्रत्येकीच्या खात्यात जमा होईल, असे त्यांनी जाहीर केले.
‘शीशमहल’मध्ये नो स्टे
अरविंद केजरीवाल यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानावर प्रचंड खर्च केल्यावरून भाजपने याला ‘शीशमहल’ संबोधून प्रचारात टीका केली होती. या शीशमहलमध्ये आपण राहणार नसल्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी जाहीर केले.
११५.६३ कोटींची संपत्ती प्रवेश वर्मा यांच्याकडे , तर कपिल मिश्रा यांच्याकडे १.०६ कोटींची संपत्ती आहे.