देशाची शान असणाऱ्या राष्ट्रपती भवनामध्ये पहिल्यांदाच लग्नसोहळा आयोजित करण्यात येणार आहे. लोक मोठमोठी हॉटेल, बँक्वेट हॉल बुक करतात. परंतू, या नवरीने तर राष्ट्रपती भवनच लग्नासाठी बुक करून टाकले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल परंतू हे खरे आहे. राष्ट्रपती भवनात लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या देवरियाचे भाटपार रानी येथील बडका गावाचे रहिवासी अवनीश तिवारी हे सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडर आहेत. अवनीश यांचे लग्न मध्य प्रदेशच्या शिवपुरीच्या पुनमसोबत ठरले आहे. त्या राष्ट्रपतींच्या पीएसओ असिस्टेंट कमांडर आहेत. म्हणून हे लग्न खासकरून राष्ट्रपती भवनात होत आहे.
आज या दोघांचे लग्न आहे. राष्ट्रपतींनी या लग्नाला राष्ट्रपती भवनात होऊ देण्याची परवानगी कशी दिली असा सवाल तुमच्या मनात आला असेल. अहो, वरात देखील राष्ट्रपती भवनात मंगळवारीच पोहोचली आहे. अवनीशच्या गावात त्याच्या लग्नाचीच चर्चा आहे. या लग्नाला परवानगी कशी मिळाली यावर त्याचे काका सांगतात की, पूनमचे काम, तिचे वागणे यामुळे प्रभावित होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लग्नाला परवानगी दिली आहे.
अवनीश हे जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत. राष्ट्रपती भवनाच्या मदर टेरेसा क्राऊन परिसरात हे लग्न सुरु आहे. या लग्नाला केवळ ९४ जणांना परवानगी देण्यात आली आहे. आता राष्ट्रपती भवन सामान्यांना अशी लग्न करण्याची परवानगी देईल का, असा सवाल तुमच्या मनात आला असेल तर त्याचे उत्तर आहे, नाही. ही परवानगी केवळ पुनम यांनाच देण्यात आली आहे. यापुढे राष्ट्रपती भवनाचे अधिकारी जर लग्न करणार असतील तर त्यांना अशी परवानगी दिली जाईल का, या प्रश्नावर येणारा काळच उत्तर देईल.