बासरी म्हणजे निसर्गाचाच स्वर (भाग १)

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:05+5:302015-02-14T23:52:05+5:30

- सुप्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया : लोकमतशी संवाद

Flute is the nature of nature (Part 1) | बासरी म्हणजे निसर्गाचाच स्वर (भाग १)

बासरी म्हणजे निसर्गाचाच स्वर (भाग १)

-
ुप्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया : लोकमतशी संवाद
नागपूर : बासरी हे वाद्यच कुठल्याही तांत्रिकतेशिवाय निर्माण झालेले प्राचीन वाद्य आहे. यात ना तार आहे ना कुठले यंत्र. शुष्क वेळूची पोकळ छिद्रांकित नळी म्हणजे बासरी. त्यात श्वासांचा प्राण फुंकावा लागतो आणि त्यातूनच बासरीचे चैतन्यमयी स्वर निघतात. जगात सर्वत्र बासरीचे प्रचलन आहे आणि त्याला वेगवेगळी नावे आहेत. जगातले सारेच संगीत या बासरीत सामावले आहे. बासरीचा स्वर म्हणजे निसर्गाचाच ईश्वरीय स्वर आहे. बासरीचे स्वर ऐकू आले तरी आपण थबकतो, बासरी ऐकाविशी वाटते, बासरीचे स्वर मोहात पाडतात, असे मत सुप्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांनी व्यक्त केले.
पं. सी. आर. व्यास महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी नागपुरात आले असताना त्यांच्याशी संवाद साधला. राकेश चौरसिया म्हणाले, बासरीत ही मोहकता असण्यामागे खूप कारणे आहेत. त्याला भगवान कृष्णाचाच आशीर्वाद आहे. भगवान कृष्णाच्या बासरीतून निघणाऱ्या दैवी स्वरांची वर्णने आजही आपल्या परंपरेत आहेतच. बासरी म्हणजे स्वत:ची गोड वाणी असणारे वाद्य आहे. त्यामुळेच गायकीच्या अंगाने बासरी वाजते. यातून प्रत्येक स्वरांची निर्मिती होते. पण तरीही भारतीय शास्त्रीय संगीतात बासरी आणि संतूरला मात्र मधल्या काळात स्थान मिळाले नाही. त्यानंतर पं. पन्नालाल घोष आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या प्रयत्नाने बासरी जगभर प्रसिद्ध झाली आणि भारतीय संगीताचे सगळेच स्वर यात चपखलपणे निघू शकतात, हे सिद्ध झाले. त्यानंतर सध्या तर जगात कुठलाही कार्यक्रम असो वा देशातला कुठलाही महोत्सव बासरीशिवाय त्यात अपूर्णताच राहते. संपूर्ण जगात बासरी शिकण्यासाठी युवा वर्गात उत्साहाचे आणि कुतूहलाचे वातावरण आहे पण जिद्द असणारेच लोक बासरी शिकू शकतात. तार छेडल्यावर ध्वनी येतो, तबल्यावर थाप दिल्यावर ध्वनी उमटतो पण बासरी फुंकल्यावर ध्वनी येत नाही. बासरीतून स्वर काढण्यासाठी साधनाच करावी लागते. कुणाला ती लवकर जमते तर कुणाला वर्ष, तीन वर्षेही लागतात. इतका संयम शिकणाऱ्याजवळ असणे गरजेचे असते. त्याशिवाय बासरी शिकता येत नाही. बासरीच्या स्वरात चैतन्य आहे, आनंद आहे, विरह, व्याकुळता, उत्कटता आणि माधुर्य आहे. पण बासरीचे शक्तिस्थान मात्र मेडिटेशनचे आहे. बासरी ऐकताना आणि वाजविताना आपण अनुभूतीच्या पातळीवर एका समाधीवस्थेपर्यंत पोहोचतो, याचा प्रत्यय मी अनेकदा घेतला आहे.

Web Title: Flute is the nature of nature (Part 1)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.