मुंबईच्या बेशिस्त प्रवाशावर पाच वर्षे विमान प्रवासबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:44 IST2018-05-21T00:44:04+5:302018-05-21T00:44:04+5:30
जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.

मुंबईच्या बेशिस्त प्रवाशावर पाच वर्षे विमान प्रवासबंदी
नवी दिल्ली : विमानाचे अपहरण करण्यात आल्याची आवई उठवून विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.
बेशिस्त प्रवाशांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची आणि त्यांना ‘नो प्लार्इंग लिस्ट’वर टाकण्याची नियमावली नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लागू केल्यानंतर प्रवाशावर अशा प्रकारची कारवाई केली जाण्याची ही पहिली वेळ आहे.
सल्ला यांचे नाव जेट एअरवेजने ‘नो फ्लाइंग लिस्ट’ मध्ये टाकले असले तरी ही बंदी फक्त त्याच कंपनीच्या विमानांच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांना लागू होईल. बंदी घातलेल्या प्रवाशास विमानाने प्रवास करू द्यायचा की नाही याचा निर्णय इतर कंपन्या घेऊ शकतील.
गेल्या वर्षी ३० आॅक्टोबर रोजी जेटच्या मुंबई-दिल्ली विमानाने प्रवास करत असताना सल्ला यांनी बिझनेस क्लासच्या स्वच्छतागृहात विमान अपहरणाची घबराट निर्माण करणारी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात ‘१२ अपहरणकर्त्यांनी विमान ताब्यात घेतले आहे व सामान ठेवायच्या जागेत स्फोटकेही आहेत. विमान दिल्लीला न उतरविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे. तसे न केल्यास अनेक प्रवाशांना हकनाक प्राणास मुकावे लागेल’, असे लिहिले होते.
यानंतर विमान अहमदाबादला उतरवून तपासणी केली असता सल्ला यांनी चिठ्ठीत लिहिलेली धमकीवजा माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते.
समितीने केली चौकशी
‘नो फ्लाइंग लिस्ट’साठी तयार करण्यात आलेल्या नियमानुसार जेट एअरवेजने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या घटनेची चौकशी केली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समितीच्या शिफारशीनुसार सल्ला यांच्यावर पाच वर्षांसाठी प्रवासबंदी लागू केली.