Five IAF officers found guilty in Mi-17 chopper crash | एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी हवाई दलाचे पाच अधिकारी दोषी 
एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी हवाई दलाचे पाच अधिकारी दोषी 

नवी दिल्ली -  श्रीनगरजवळील बडगाम येथे 27 फेब्रुवारी रोजी एमआय-17 विमानाला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी हवाई दलाच्या पाच अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विमानांनी केलेल्या घुसखोरीनंतर उडालेल्या गोंधळादरम्यान या अधिकाऱ्यांनी आपल्याच हेलिकॉप्टरवर प्रतिहल्ला केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. आता हवाई दलाकडून या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 

 पाकिस्तानी विमानांनी केलेल्या घुसखोरीवेळी त्यांना रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचे नेतृत्व पश्चिम कमांडचे प्रमुख एअर मार्शल हरि कुमार करत होते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या पाच अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे त्यांच्यावरील पुढील कारवाईसाठी त्यांचा अहवाल हवाई दलाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एक ग्रुप कॅप्टन, दोन विंग कमांडर आणि दोन प्लाइट लेफ्टनंट यांचा समावेश आहे.   पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर एअरस्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण दक्ष असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हा हल्ला हाणून पाडला होता. मात्र या आणीबाणीच्या परिस्थितीत हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन सहा जवानांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हे हेलिकॉप्टर आपल्याच सुरक्षा यंत्रणांकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्राची शिकार झाल्याचे समोर आले होते.   


Web Title: Five IAF officers found guilty in Mi-17 chopper crash
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.