अर्थमंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांना कारावास
By Admin | Updated: June 23, 2014 04:49 IST2014-06-23T04:49:21+5:302014-06-23T04:49:21+5:30
सुमारे ४़२० लाख रुपयांच्या रजा व प्रवास सवलत (एलटीसी) घोटाळ्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने रविवारी अर्थ मंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांसह सहा जणांना प्रत्येकी चार वर्षे कारावासाची शिक्षा

अर्थमंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांना कारावास
नवी दिल्ली : सुमारे ४़२० लाख रुपयांच्या रजा व प्रवास सवलत (एलटीसी) घोटाळ्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने रविवारी अर्थ मंत्रालयाच्या पाच कर्मचाऱ्यांसह सहा जणांना प्रत्येकी चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली़ फसवणूक करून एलटीसीची अग्रिम रक्कम काढणे आणि ती वितरित करण्याचा आरोप त्यांच्यावर होता़
सीबीआयचे विशेष न्यायाधीश संजीव जैन यांनी तीन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सहा व्यक्तींना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमाअंतर्गत फौजदारी कट, फसवणूक आणि कटकारस्थानात दोषी ठरविले आहे़ न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यांमध्ये अर्थमंत्रालयाचे लक्ष्मीचंद (६७), बालेसिंह कसाना (५५), भगवानसिंह (५५) तसेच रघुवेंद्र कुमार (६३) आणि जे एल चोपडा (७०) यांचा समावेश आहे़ यापैकी चंद, कुमार आणि चोपडा निवृत्त झाले आहेत़ न्यायालयाने अर्थ मंत्रालयातील तत्कालीन कर्मचारी एसक़े़डी़ दास नायक यांनाही शिक्षा सुनावली़ ते तूर्तास कृषी भवनस्थित ग्रामविकास मंत्रालयात कार्यरत आहेत़ न्यायालयाने चंद, कसाना, सिंह, कुमार व नायक यांना प्रत्येकी एक लाख तर चोपडांना ५० हजार रुपये दंडही ठोठावला़ अर्थमंत्रालयात शिपाई असलेल्या पुरुषोत्तम लाल याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली, तर अन्य दोन आरोपी रमेशचंद शुक्ला आणि दिवाकर दीक्षित यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला़ कुणीही भ्रष्टाचार दडवू शकत नाही आणि भ्रष्ट व्यक्ती कायद्यापासून वाचू शकत नाही, असा कठोर संदेश समाजात जावा.
असे शिक्षा ठोठावताना न्यायालयाने म्हटले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)